कोल्हापूर : बोगस कस्टम अधिकारी तसेच सीबीआय अधिकाऱ्यांनी भाजप नेते समरजित घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे (वय ३७, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) यांना २० लाख रुपयांना गंडा घातला आहे. मलेशियात पाठवण्यासाठी दिलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आणि बनावट पासपोर्ट असल्याचे सांगत तोतयांनी हे कृत्य केले आहे. घाटगे यांनी शाहूपुरी पोलिसांत तीन संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

२ जून रोजी नवोदिता घाटगे यांच्या मोबाइलवर एक कॉल आला होता. पलीकडून बोलणाऱ्याने आपण कस्टम अधिकारी असल्याचे सांगत तुम्ही मलेशियात पाठवण्यासाठी दिलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ, तुमच्या नावाचे बनावट पारपत्र आणि एटीएम कार्ड आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर गुन्हा आहे. सबब तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी भीती घातली.

हेही वाचा : डॉ. सुनीलकुमार लवटे अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर उपक्रमांचे आयोजन

त्यानंतर दुसऱ्या दोन क्रमांकावरून आणखी संपर्क साधला गेला. तेव्हा तर त्यांनी आपण सीबीआयमधील गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी असल्याचे सांगितले. तुम्ही केलेला गुन्हा गंभीर आहे. तो दाखल करायचा नसेल, तर पैसे द्यावे लागतील, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर जबरदस्तीने २० लाख रुपये ऑनलाइन वर्ग करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घाटगे यांनी अनिल यादव, अजित (पूर्ण नाव, पत्ता उपलब्ध नाही) यांच्यासह कस्टम अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.