सांगली : किरकोळ वादातून एकाचा मुलासमोरच दगडाने ठेचून खून करण्याची घटना विश्रामबाग धामणी रस्त्यावर रात्री घडली. घटनेनंतर पळून जाणाऱ्या तीन संशयितांना नागरिकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

सांगली शहरात शनिवारी रात्री अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली असून किरकोळ वादातून बाप- लेकावर हल्ला करून वडिलांची मुलाच्या डोळ्यादेखत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना सांगली शहरातील इनाम धामणी रोडवरील कच्च्या रस्त्याजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत व्यक्तीचे नाव कीर्तीकुमार शेडबाळे (वय ५०) असे असून ते आपल्या मुलासह दुचाकीवरून इनाम धामणी परिसरातून जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला बसलेल्या तीन संशयित व्यक्तींशी त्यांचा किरकोळ वाद झाला. वादाचे रूपांतर क्षणार्धात हिंसाचारात झाले. संशयित हल्लेखोरांनी कीर्तीकुमार शेडबाळे व त्यांच्या मुलावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात कीर्तीकुमार शेडबाळे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली, तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या संशयितांना संतप्त नागरिकांनी पाठलाग करून पकडले व बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा जीव गेल्याने परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणाची नोंद विश्रामबाग पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, याचा सखोल तपास सुरू आहे. संशयित आरोपींची चौकशी सुरू असून या हत्येमागील नेमके कारण काय, हे लवकरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.