सांगली : अंगणात खेळत असलेल्या चार वर्षाच्या बालकांवर बिबट्याने हा करून ठार केल्याचा प्रकार बिऊर (ता. शिराळा) येथे घडला. या घटनेमुळे नागरिकांनी वन विभागाच्या कार्यालयावर रात्री दगडफेक करत आपला संताप व्यक्त केला. बालकाला उपचारासाठी उप जिल्हा रूग्णालयात दाखल केल्यानंतर रूग्णालयाबाहेरही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
बिउर या गावी चार वर्षाचा राजवीर पाटील हा सायंकाळी घरासमोरील अंगणात खेळत होता. खेळण्याच्या नादात असतानाच अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. मुलाला जबड्यात धरून मुलासह बिबट्याने धूम ठोकली. ही घटना लोकांच्या व मुलाच्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बिबट्याचा आरडाओरडा करत पाठलाग केला. मुलाला जबड्यात धरून पळत असलेल्या बिबट्याचा सुमारे अर्धा किलोमीटर नागरिकांनी पाठलाग केल्यानंतर बिबट्याने मुलाला खाली टाकून रानात पलायन केले.
गंभीर जखमी अवस्थेत मुलाला शिराळा येथील उप जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना मुलाचा मृत्यू झाल्याचे उपचार करणार्या डॉक्टरांनी जाहीर केले. यावेळी रूग्णालयाबाहेर शेकडो लोक जमा झाले होते.
गाव-शिवारात बिबट्याच्या सततच्या वावरामुळे आणि वारंवार होणार्या हल्ल्यांमुळे बिऊर आणि परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीखाली होते. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांचा संयम सुटला. संतप्त जमावाने शिराळा येथील वनविभागाच्या कार्यालयावर दगडफेक केली.

