कराड : देशी गोवंश संवर्धन, सेंद्रिय शेती, पर्यावरण संरक्षण आणि संस्कृतीचा जागर करत इंदोली (ता. कराड) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात बेंदूर सण साधेपणाने व प्रबोधनात्मक पद्धतीने साजरा करण्यात आला. देशी गाई, बैल, कालवडी व खोंडांचे संगोपन करणाऱ्या ३५ पशुपालक शेतकऱ्यांना जिल्हा परिषद सदस्य मदन काळभोर व पंचायत समिती सदस्या धैर्यजा माने यांच्या हस्ते फेटा व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
‘चला देशी गोवंश जतन करूया; संस्कृती, परंपरा आणि पर्यावरण सावरूया’ या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात देशी गाईचे ए२ दूध, सेंद्रिय शेतीतील गोवंशाचे स्थान आणि पर्यावरणपूरक शेतीवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. सन्याल तासगावकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नीता भोसले, व्रणोपचारक पोपट चव्हाण, डॉ. अभिजित मोरे व डॉ. सुभाष सोनवणे उपस्थित होते.
(औषध संच मोफत वाटप )
पशुवैद्यकीय दवाखाना व संबंधित कंपनीच्या सहकार्याने उपस्थित सर्व पशुपालकांना जंतनिर्मूलन, गोचीड निर्मूलन, खनिज मिश्रण, टॉनिक, मलमे, फॉस्फरस पावडर व वंध्यत्वावरील औषधांचा समावेश असलेली दोन हजारांहूनअधिक मूल्याचे संच मोफत देण्यात आले.
( सलग नवव्या वर्षी उपक्रम )
सण- उत्सवांना पशुपालक सक्षमीकरणाची जोड देण्याच्या हेतूने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नीता भोसले व पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. विजय भोसले यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम सलग नवव्या वर्षी राबवण्यात आला. हे नऊ वर्षांचे सातत्य निश्चित प्रशंसनीय व इतरांसाठी अनुकरणीय सुद्धा ठरले आहे.
( शेतकरी पशुपालकांचा प्रतिसाद )
इंदोली व परिसरातील चारशेहून अधिक शेतकरी व पशुपालकांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. पारंपरिक सणाला तांत्रिक सेवा व जनजागृतीची जोड देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
