कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोल्हापूरचे राजकारण हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भोवती केंद्रित झाले होते. सत्तांतर झाल्यावर कोल्हापूरचे राजकीय संदर्भ बदलू लागले. या साऱ्या राजकीय घडामोडींमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात शिंदे आणि भाजप यांचा प्रभाव दिसू लागला आहे.

राज्यातील नव्या राजकीय समीकरणात एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आले आहे. त्यांनी विकासकामांना गती देत असताना आधीच्या आघाडी सरकारचे निर्णय बासनात गुंडाळून ठेवले आहेत. दुसरीकडे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. या घडामोडीचा कोल्हापूर जिल्ह्यात नेमका राजकीय परिणाम साधला जाणार याविषयी तर्क लावले जात आहे. गेली अडीच वर्षे जिल्ह्यात महाविकास आघाडीचा दबदबा राहिला. आता शिंदे- भाजप युतीची ताकद वाढली आहे. परिणामी कोणाच्या पारडय़ात यश किती पडणार यावर याची शक्यता अजमावली जात आहे.

लोकसभा शिंदे गटासाठी पूरक

मंडलिक व माने या दोन्ही खासदारांनी शिंदे यांचे समर्थन केले आहे. स्वाभाविकच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संजय मंडलिक तर हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने हे दोघे विद्यमान खासदार असल्याने त्यांना उमेदवारी मिळू शकते.

मागील वेळी शिवसेनेकडे दोन्ही जागा असल्याने युती मित्रपक्ष असलेल्या भाजपलाही प्रचाराची धुरा वाहावी लागली होती. आताही मंडलिक, माने यांना विजयी करण्यासाठी भाजपच्या यंत्रणेला हिरिरीने प्रचार करावा लागणार असल्याने लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यात कमळ असणार नाही. विजय मिळाला तर शिंदे गटाला येथे लाभ होऊ शकतो. दोन्ही मतदारसंघांत विरोधातील उमेदवार कोण असणार याबाबत अनिश्चितता आहे.

विधानसभेसाठी समान संधी

जिल्ह्यात १० विधानसभा मतदारसंघ आहेत. शिवसेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर यांना शिंदे गटाकडून राधानगरी मतदारसंघाची उमेदवारी मिळू शकते. कोल्हापूर शहरात उत्तर व दक्षिण असे दोन मतदारसंघ भाजपच्या वाटय़ाला गेले असल्याने दोन्ही जागांवर भाजपचा दावा कायम असेल. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेला काँग्रेसच्या उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे लागले होते. आताही आघाडी धर्म पळून शिवसैनिकांना तेच काम करावे लागेल. तर, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या उमेदवारांनी विजयी करण्यासाठी ताकद खर्च करावी लागेल. शिरोळ तालुक्यात राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिंदे गटाचे उमेदवार असतील. त्यामुळे मूळच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रचारासाठी प्रयत्न करणे भाग आहे. गेल्या निवडणुकीत इचलकरंजीत भाजपच्या आमदारांना पराभूत करून अपक्ष आमदार प्रकाश आवाडे विजयी झाले होते. ते भाजपच्या वाटेवर असल्याने आगामी निवडणुकीत ते कमळ घेऊन रिंगणात उतरण्याची चिन्हे असल्याने येथेही भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात राहण्याची शक्यता दिसते. कागल मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा सामना आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी होणार हे उघड आहे.पन्हाळा, हातकणंगले या दोन मतदारसंघात भाजपबरोबर असलेल्या जनस्वराज्य शक्ती पक्षाचा दावा आहे. पन्हाळय़ामध्ये आमदार विनय कोरे हे पुन्हा उमेदवार असतील. हातकणंगलेमध्ये त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपचा प्रयत्न राहील. करवीर मध्ये शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके शिवसेनेत सक्रिय नाहीत. ते भाजपकडे सरकण्याची चिन्हे असल्याने तेच उमेदवार असण्याची शक्यता आहे. चंदगडमधील शिवसेनेचा एक गट शिंदेंना पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याने त्यांच्यातील तगडय़ा नेतृत्वास उमेदवारी मिळू शकते. शिंदे गट आणि भाजप यांना समप्रमाणात विधानसभा मतदारसंघ वाटणीला येतील. आपले अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न राहणार असला तरी दोन्ही कॉंग्रेस – शिवसेना यांच्याशी तुल्यबळ मुकाबला अटळ असणार आहे.