कोल्हापूर : शाहू कारखान्याने गत हंगामात चार प्रकल्पांची यशस्वीपणे उभारणी केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यात बायो सीएनजी, कार्बन-डाय ऑक्साइड व सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी साखर निर्मितीवर न थांबता उपपदार्थांची निर्मिती केली पाहिजे या संस्थापक विक्रमसिंह राजेंच्या शिकवणीनुसार उपपदार्थ निर्मितीवर भर देणार असून त्यासाठी दहा वर्षाचे नियोजन तयार आहे, असे प्रतिपादन शाहू समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी शुक्रवारी केले.

कागल येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची ४७वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना पार पडली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्षा सुहासिनी घाटगे होत्या. त्या म्हणाल्या, शाहू कारखाना प्रगतीचे अनेक टप्पे गाठत आहे. समरजीतसिंहराजे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या नियोजनाला सभासद शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सर्वांनी साथ द्यावी.स्वागत उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी केले. कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी विषय पत्रिकेचे वाचन केल्यावर सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. अभिनंदन ठरावाचे वाचन सहायक सचिव व्ही.एल. जत्राटे यांनी केले. आभार संचालक युवराज पाटील यांनी मानले.

हेही वाचा >>>कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीची साथ सोडून सहकारातील बडे नेते पुन्हा महाविकास आघाडीत

१०० कोटी युनिटची वीज निर्मिती

शाहू कारखान्याने सोळा वर्षापूर्वी सुरु केलेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून आजपर्यंत १०० कोटी युनिटस् वीज निर्मितीचा टप्पा ओलांडला आहे. हा अभिमानाचा क्षण आहे, असा उल्लेख घाटगे यांनी केला. त्यास सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.