सांगली : लग्न मोडल्याच्या आणि कापड दुकानात झालेल्या किरकोळ वादातून एका तरूणाचा कोयता व चॉपरने वार करून खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री ईश्‍वरपूरमधील कामेरी नाका परिसरात घडली. या प्रकरणी दोन संशयिताविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

या प्रकरणी घटनास्थळ व पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार मृत तरूण सूरज महादेवा कांबळे (वय ३१) आणि दोन संशयितांचा कापड दुकानात रविवारी रात्री आठ वाजणेच्या सुमारास किरकोळ वाद झाला. यावेळी हा वाद मिटवण्यात आला. मात्र, सूरज कामेरी नाका परिसरात आल्यानंतर त्याच्यावर संशयितांनी चॉपर व कोयत्याने वार केले. मध्यरात्री साडेअकरा वाजणेच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सूरजला उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना आज पहाटे चार वाजणेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी ईश्‍वरपूर पोलीस ठाण्यात संशयिताविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आणि मृत यांच्यात पुर्वी लग्न मोडल्याच्या कारणावरून वाद धुमसत होता. त्यातच कापड दुकानात झालेल्या किरकोळ वादाने आगीत तेल ओतले. यातूनच चिडून संशयितांनी त्याचा धारदार हत्याराने वार करून खून केला. या घटनेनंतर संशयित पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलीसांची पथके तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.