सांगली : ईश्वरपूर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि नगरसेवक सुनील मलगुंडे यांना अपात्र ठरविणाऱ्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अवैध बांधकाम प्रकरणी जयकर जाधव यांनी संबंधित तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची सुनावणी झाल्यानंतर सांगली जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व नगरसेवक सुनील मलगुंडे यांना अपात्र ठरविण्याचा आदेश दिला होता. या निर्णयामुळे ईश्वरपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरोधात मलगुंडे बंधूंनी राज्य शासनाकडे दाद मागितली होती. दरम्यान, आमदार जयंत पाटील यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आणि संबंधित आदेशाबाबत फेरविचार करण्याची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर अपिलावर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या समोर आज सुनावणी होऊन शकली नाही. मात्र पुढील आदेशापर्यंत अपात्रतेच्या कारवाई आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यानुसार नगरविकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी स्थगितीचा आदेश जारी केला. त्यामुळे आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्षपद तसेच सुनील मलगुंडे यांचे नगरसेवकपद सध्या कायम राहणार आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे ईश्वरपूर नगरपालिकेतील राजकीय घडामोडींना वेग आला असून पुढील सुनावणी आणि अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.