सांगली : हॉटेलमध्ये जेवण करून परतत असताना पाय घसरून विहीरीत पडल्याने दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली. दोन्ही मृत विद्यार्थी परिचारिका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी ईश्वरपूरमध्ये वास्तव्यास होते. प्रशांत पाटील (वय २५ रा. जळगाव) आणि गंगाधर सुकुरवार (वय २४ रा.नांदेड) अशी या मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोघेही ईश्वरपूर येथील प्रकाश हॉस्पिटलमध्ये परिचारिका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होते.
दोघेही विद्यार्थी मंगळवारी रात्री जेवणासाठी हॉटेल मून लाईट बार या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होर्ते. रात्री साडेअकरा वाजणेच्या सुमारास जेवण करून बाहेर पडले असता रस्त्याकडेला असलेल्या विहीरीत प्रशांत पाटील हा पाय घसरून पडला. त्याला वाचविण्यासाठी गंगाधर सुकुरवार हाही विहीरीत उतरण्याच्या प्रयत्नात विहीरीत कोसळला. याच वेळी त्यांच्यासमवेत असलेला मित्र संकेत उंडे (वय २४ रा. माघापूर, जि. अहिल्यानगर) याच्या लक्षात येताच त्यांने तात्काळ याची माहिती पोलीसांना दिली.
या घटनेची माहिती ईश्वरपूर पोलीस ठाण्याकडून आपत्कालीन पथक, आपत्ती व्यवस्थापन सांगली यांना देण्यात आली. माहिती मिळताच विशेष बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पथकाने आवश्यक बचावकार्य करून विहिरीतील दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर दोन्ही मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी व कायदेशीर प्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
