गुन्हेगारांच्या हातून चूक घडते, पण त्याची शिक्षा एकापरीने कुटुंबाला मिळते. एका चुकीच्या फटक्यामुळे सुखी कुटुंब उद्ध्वस्त कसे होते, याचा रुपेरी पडद्यावर अभिनय पाहून येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचे डोळे पाणावले.
‘बाबांची शाळा’ या चित्रपटाच्या प्रीमियर शोचे आयोजन कळंबा मध्यवर्ती कारागृहात केले होते. हा अनुभव कैद्यांना नखशिखान्त हादरवून टाकणारा होता. कारागृहातील कैद्यांच्या जीवनावरील कथानक असलेला हा चित्रपट. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेते सयाजी िशदे यांनी कळंबा कारागृहातील कैद्यांशी संवाद साधला. नकळत घडलेली चूक आयुष्याची कशी राखरांगोळी करते. शिक्षा भोगत असताना कुटुंबीयांना टीकेस द्यावे लागणारे तोंड, समाजाचा कुटुंबावरील अघोषित बहिष्कार अशा हृदयद्रावक कथेने कैद्यांचे डोळे पाणावले. चित्रपटातील काही प्रसंग भावल्याने कैद्यांनी टाळय़ांचा गजर केला. कारागृह अधीक्षक शरद शेळके व कर्मचारी उपस्थित होते.