जालना – जालना शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर नंदापूर गावाजवळ उभारण्यात येत असलेल्या शंभर फूट उंच भारतमाता मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी यांच्या हस्ते सोमवारी (२८ सप्टेंबर) सायंकाळी चार वाजता होणार आहे. उद्योजक घनश्याम गोयल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. भगवान महाराज आनंदगडकर यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभारण्यात येत आहे. सुमारे दोन ते तीन कोटी रुपये खर्चून हे मंदिर उभारण्यात येत असून भारतीय संस्कृती, इतिहास आणि वैज्ञानिक प्रगतीचे दर्शन घडविण्याचा उद्देश या प्रकल्पामागे आहे.
प्रकल्पाचे अभियंता चंद्रप्रकाश शर्मा यांनी सांगितले की, शंभर फुटांपेक्षा अधिक उंचीच्या या मंदिराच्या तळमजल्यावर सुमारे चार हजार चौरस फुटांचे सभागृह आहे. पहिल्या टप्प्यात या सभागृहात पाच फूट उंचीची भारतमाता मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात येणार असून, येथे दररोज पूजाअर्चा केली जाणार आहे.
सभागृहात स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांचे छायाचित्र प्रदर्शन तसेच ग्रंथालयाची व्यवस्था करण्यात येणार आहे. भारताच्या विविध सांस्कृतिक आणि स्थापत्य परंपरांचे दर्शन घडविण्यासाठी लाल किल्ल्याची प्रतिकृती, कोणार्क मंदिरातील चक्र, अजिंठा लेण्यांच्या कमानीसह उत्तर आणि दक्षिण भारतातील विविध स्थापत्यशैलींचा समावेश करण्यात येणार आहे. भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचे दर्शन घडविण्यासाठी चांद्रयान आणि क्षेपणास्त्रांच्या प्रतिकृती प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
भारतीय संस्कृती व इतिहासाबाबत जनजागृती करण्याबरोबरच ‘ज्ञान यज्ञा’च्या माध्यमातून ज्ञानवर्धनाची परंपरा पुढे नेण्याचा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.
