जालना : जालना शहरातील एका तीन ते वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अजय विठोरे याला जालना येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.जलदगती न्यायालयाने दोषारोपपत्र दाखल झाल्यावर दोन महिन्यांच्या आत हा निकाल दिला. संवेदनशील असलेल्या या प्रकरणात सदर बाजार पोलिसांनी जलदगतीने तपास पूर्ण २२ दिवसांत दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर विशेष जलदगती न्यायालयाने २२ सुनावण्या आणि २५ साक्षीदार नोंदवून केवळ ५७ दिवसांत निकाल दिला.
जालन शहरात १० जून रोजी तीन ते चार वर्षीय चिमुकली घरासमोर खेळत असताना आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून पळवून नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेमुळे जालना शहरात संतापाची लाट उसळली होती. घटनेनंतर सदर बाजार पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत पुरावे संकलित केले आणि अवघ्या २२ दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे तसेच सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांचा विचार करून न्यायालयाने आरोपी अजय विठोरे याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम साळी,विशेष सरकारी वकील वर्षा मुकीम यांनी यासंदर्भात वार्ताहरांना माहिती दिली.
