सांगली : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ठरावधारक मतदाराला मारहाण करून अपहरण करण्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी अपहृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार आणि सर्वपक्षीय पॅनेलचे उमेदवार विनोद पवार या दोघा बंधूसह चौघांविरुद्ध उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दि. १ नोव्हेंबरला मतदान आहे.

जत तालुका सोसायटी गटातून आ. गोपीचंद पडळकर व विनोद पवार यांच्यात अटितटीची लढत होत आहे. या पार्श्वभूमीवर ठरावधारक मतदारांनी आपल्याला मतदान करावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. फिर्यादी पद्माक्का कळ्ळी यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार श्रीमती कळ्ळी घरी असताना त्यांच्या घरासमोर पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी येऊन थांबली. त्यातून सुनील पवार, विनोद पवार आणि अन्य दोन अनोळखी व्यक्ती उतरल्या. त्यांनी फिर्यादीचा मुलगा आणि मतदार श्रीशैल कळ्ळी यांनी याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी फिर्यादीने मुलाला मारहाण करण्याचे कारण विचारले असता, सुनील पवार याने त्याचा भाऊ विनोद पवार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उभा असल्याने श्रीशैल याने त्यांच्या बाजूने मतदान करावे, असे सांगितले. त्यानंतर सुनील पवार याने हातातील लोखंडी गजाने श्रीशैल याला मारहाण केली. तसेच, ‘तुला जिवंत ठेवत नाही,’ अशी धमकी दिली. यानंतर संशयितांनी श्रीशैल याला पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीत बसवून उमदी गावाच्या दिशेने नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सुनील पवार, विनोद पवार आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध काल सायंकाळी तक्रार दाखल करण्यात आली आहे.