सांगली : जिल्हा परिषद सभापती निवडी अविरोध होणे हाच पिक्चर होता, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे माझे हितचिंतक आहेत असे म्हणत टीकेला प्रत्युत्तर देण्यास आमदार जयंत पाटील यांनी नकार दिला. आम्ही सर्व नेतेमंडळी एकत्रित पणे जिल्हा परिषदेचे कामकाज अधिकाधिक लोकाभिमुख चालविणार असून शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबरोबरच आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यास प्राधान्य देणार आहोत असेही त्यांनी बुधवारी सांगितले.
जिल्हा परिषदेतील सभापती निवडी आज अविरोध पार पडल्या. यानंतर आमदार पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खा. विशाल पाटील, आ. विश्वजित कदम, आ. रोहित पाटील, माजी आ. विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, मानसिंगराव नाईक, राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले, आम्ही मातब्बर मंडळी जिल्हा परिषदेच्या निमित्ताने एकत्रित आलो आहोत. यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार अधिकाधिक विकासाचा व्हावा यासाठीच आमचे प्रयत्न असतील. काही शाळा स्मार्ट स्कूल म्हणून विकसित करण्यात आल्या आहेत. आता उर्वरित शाळांही स्मार्ट स्कूल करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा अधिक चांगला करण्यासाठी शिक्षकांशीही संवाद साधून त्यांच्या सूचनाही विचारात घेतल्या जातील. याचबरोबर ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी औषधे वेळेवर मिळतील, डॉक्टर वेळेवर उपस्थित राहतील याकडे लक्ष दिले जाईल. जिल्हा परिषद निवडणुकीवेळी आम्ही काही ठिकाणी तडजोडी केल्या होत्या. या तडजोडीनुसारच सत्ता स्थापन करण्यात आली आहे. नवीन पदाधिकारी अधिक चांगल्या पध्दतीने कामकाज करतीलच यात शंका नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पाच सदस्य आमच्यासोबत आहेत. त्यांचे नेते आणि आम्ही गेली तीस-चाळीस वर्षे एकत्रित काम करत आहोत. यामुळे त्यांच्या सवयी ज्ञात आहेत. यापुढील निवडणुका आम्ही एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतले आहेत.
शिवसेनेचे आमदार सुहास बाबर आणि तानाजी पाटील यांच्यात बिब्बा घालण्याचे काम तुम्ही केले असल्याची टीका पालकमंत्री पाटील यांनी केली आहे. याबाबत विचारले असता आ. पाटील म्हणाले, पालकमंत्री माझे हितचिंतक आहेत, यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी काहीच बोलणार नाही. दरम्यान, पालकमंत्री पाटील यांनी सभापती निवडीवेळी चमत्कार घडेल, आमची बोलणी सुरू असल्याचे सांगितले होते. मात्र, महायुतीच्या नेत्यांच्या हाती सत्ताधारी गटाचे सदस्य लागणार नाहीत याची तयारी महाविकास आघाडीने केली होती. विरोधकामधील तीन सदस्य पुन्हा आघाडीकडे वळविण्यात यश आले असून याबदल्यात शिवसेनेचे सदस्य पृथ्वीराज पाटील यांच्याकडे बांधकाम समिती सोपविण्यात आली आहे.
