सांगली : पिंजरा चित्रपटात मास्तर तमाशा बंद करायला आले होते, पण मास्तरला तमाशाचा एवढा नाद लागला की तोच तुणतुणे घेउन फडात उभा राहिला अशी अवस्था भाजपची झाली आहे. काँग्रेसमुक्त भारत  करण्यासाठी आलेली भाजपा आता काँग्रेसयुक्त भाजप झाली आहे अशी टीका  माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केली.

सांगली महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत आमदार पाटील बोलत  होते.
आ.  पाटील म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाने ना खाने दुंगा, ना खाउंगा अशी घोषणा दिली होती. मात्र आज वेगळीच स्थिती पाहण्यास मिळत आहे.

अकोट येथे एमआयएमशी तर अंबरनाथ येथे काँग्रेसशी आघाडी केली यावर भाष्य  करताना ते म्हणाले, भाजप तवायफांची कोठी बंद करायला निघाले होते, मात्र, पैशाची खणखण ऐकून आता मुजरे करायला लागले आहेत अशी टीका शेरोशायरीच्या माध्यमातून केली.

जेष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालीी १९९६ मध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या, पण त्यांच्याकडे बहुमत नव्हते. त्यांना वेगवेगळ्या पक्षांना एकत्र करून सरकार बनवता आले असते पण त्यांनी ते केले नाही. मात्र आज भाजपा काय करतेय? सगळे काँग्रेसमधील ओढून भाजपात नेले आहेत. भाजपा सांगतात ते हिंदुत्ववादी आहेत मात्र त्यांनी अकोल्यात एमआयएम सोबत युती केली आहे. ज्या ओवेसींवर जोरदार टीका केली. आता त्याच ओवेसींच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत. सत्तेसाठी कोणाशीही आघाडी करायला यांना काही वाटत नाही. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेला भाजपा आता काँग्रेसयुक्त झाला आहे.

सांगली शहराने स्व. वसंत दादा पाटील यांचे विचारी नेतृत्व पाहिलेले आहे. आपण सर्वांनी विवेक बुद्धी जागृत ठेवली पाहिजे असे आवाहन जयंतराव पाटील यांनी केले. या शहरात जो विकास झाला तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेला आहे.

रक्त तपासणीसाठी सर्व व्यवस्था आपण मोफत किंवा माफक दरात शहरात उपलब्ध करून दिली. बचत गटाच्या वस्तू विक्रीसाठी बाजार कट्टा निर्माण केला. वंदेश वाडी हॉस्पिटलला सुमारे पाच कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. आरोग्य शिबिरे घेतली. कृष्णघाट उभारला. सांगली मिरज चौपदरीकरणाची सुरुवात केली. सांगलीला डीएसपी कार्यालय उभारले. घरपट्टी वाढीविरोधात आवाज उठवला. ड्रेनेज सिस्टीमसाठी मंजुरी मिळवली. चैत्रबन नात्यासाठी १० कोटी दिले. भाजपने आठ वर्षात काय केले? असा सवाल त्यांनी केला.