सांगली : वसंतदादा- राजारामबापू यांच्यात टोकाचा संघर्ष झाला, मात्र उभयतामध्ये जिव्हाळाही होता असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आ. जयंत पाटील म्हणाले, तर खासदार विशाल पाटील यांनी दादा- बापू वाद गैरसमजातून वाढल्याने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. यापुढे इतिहासाकडे न पाहता विकासासाठी एकत्रित काम करण्याचा निर्वाळा आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी दिला.

कासेगाव येथे जि.प.अध्यक्षा संगीता पाटील, उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, पंचायत.समिती सदस्या सुप्रिया देवराज पाटील, तसेच सर्व सभापती आणि नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खा. पाटील, माजी मंत्री आ. डॉ .कदम, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आ.मानसिंग नाईक, विक्रम सावंत,मनोज शिंदे,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,माजी अध्यक्ष अविनाश पाटील,अँड.बाबासो मुळीक, बाळासाहेब पाटील,विजयराव पाटील, सुस्मिता जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.

आ. पाटील म्हणाले,दादा – बापू टोकाचा संघर्ष झाला. मात्र त्या दोघांच्या मध्ये जिव्हाळा होता. दादांचे आमच्या घरी येणे जाणे होते. ते मुख्यमंत्री, राज्यपाल असताना मला कधी भेटी साठी प्रतिक्षा करावी लागली नाही. सांगली जिल्ह्याने स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान केले असून सातत्याने पुरोगामी विचार जपला आहे. निवडणुकीच्या काळात समोरून अगदी खालच्या स्तरावर जाऊन टीका केली,अपप्रचार केला. मात्र जिल्ह्यातील जनतेने आपण एकसंघ लढत आहोत,म्हणून आपल्या पाठीशी ताकद उभा केली आहे.आम्ही मध्यंतरी जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतली. त्यामध्ये स्मार्ट पीएचसी आणि मॉडेल स्कुलने जिल्ह्यात मोठे काम उभा राहिल्याचे लक्षात आले आहे. आपणास काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. आपण एकमेकांच्या साथीने पारदर्शी कारभार करा. जे काम कराल,ते प्रसार माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचवा. पुढच्या वेळेलाही तुम्हालाच निवडून दयायला हवे,अशी भावना जिल्ह्यातील जनतेत तयार व्हायला हवी.

खा. पाटील म्हणाले,आमच्या पिढीने दादा-बापू वाद काय आहे? हे समजून घेतला नाही आणि गैरसमजातून तो वाढत गेला. त्यातून जिल्ह्याचे नुकसान झाले,जिल्ह्यात वेगळ्या विचाराने शिरकाव केला.आता आम्ही सर्व बाजूला ठेवून जातीयवादी विचारांशी लढा देत हे आक्रमण परतावून लावू. आम्ही ईश्वरपूर आणि आष्टा नगर पलिका निवडणुका लढलो नाही आणि आ. पाटील यांनी महानगरपालिका निवडणुकीत आम्हास झुकते माप दिले. महानगरपालिकेत आपण थोडक्यात कमी पडलो. मात्र आम्ही अजून तो प्रयत्न सोडलेला नाही.

आ. कदम म्हणाले, सध्याचा काळ कठीण आहे,संघर्षाचा आहे. मात्र जिल्ह्यातील जनतेच्या जोरावर आपण वादळातही दिवा लावू. आपली इच्छा असो अथवा नसो आपणास जिल्ह्याच्या हितासाठी आणि जिल्ह्यातील चुकीचा विचार रोखण्यासाठी एकत्र येऊन लढावे लागेल. वाहना च्या आरशात सारखे बघायचे नसते,अन्यथा अपघात होईल. तसे इतिहासाकडे सारखे बघून चालणार नाही.

यावेळी जि.प.सभापती पृथ्वीराज पाटील, सावित्री तमणगौडा रविपाटील,स्नेहल मोरे, दादासाहेब कोळेकर,वाळवा पंचायत समितीचे सभापती उदयसिंह पाटील,उपसभापती प्रकाश पाटील,कवठेमहांकाळ पंचायत समितीच्या सभापती सिंधुताई पाटील,उपसभापती वामन कदम यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.