सोलापूर : “खासदार प्रणिती शिंदे यांचे वडील सुशीलकुमार शिंदे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. दुष्काळ निवारणाची प्रक्रिया, कायदे आणि शासकीय नियम काय असतात, तसेच नुकसानभरपाईचे निकष कसे ठरतात, याचे धडे त्यांनी घरातच वडिलांकडून गिरवायला हवेत. वडिलांकडून काही चांगले संस्कार घेण्याऐवजी शेतकऱ्यांच्या मदतीचा शासकीय आदेश जाळणाऱ्यांच्या संवेदनशीलतेची आणि बुद्धीची कीव येते,” अशी जोरदार टिका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली.सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर रविवारी ते पत्रकारांशी बोलत होते. दुष्काळी मदतीबाबतच्या शासन निर्णयाची (जीआर) होळी केल्याप्रकरणी गोरे यांनी खासदार शिंदेंवर जोरदार टिका केली.

दुष्काळ निवारणासाठी ‘डीपीडीसी’चा निधी….

जिल्ह्यातील भीषण परिस्थिती पाहता काँक्रिटीकरण व इतर विकासकामांना स्थगिती देऊन जिल्हा नियोजन समितीचा (डीपीडीसी) निधी दुष्काळ निवारणासाठी प्राधान्याने वळवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच वनक्षेत्रात पाण्याच्या शोधात येणाऱ्या वन्यजीवांसाठी पाणवठे व चारा उपलब्ध करण्याच्या सूचना वन विभागाला दिल्या आहेत, असे गोरे यांनी सांगितले.

‘ठाकरेंना दुष्काळापेक्षा निवडणूक महत्त्वाची’…

ठाकरे बंधूंच्या गर्जना आंदोलनाबाबत बोलताना गोरे म्हणाले, “संविधानाने आंदोलन व भाषणस्वातंत्र्य दिले असले तरी संकटात बळीराजाच्या पाठीशी उभे राहणे ही नेत्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, ठाकरेंना शेतकऱ्यांच्या दुःखापेक्षा निवडणुकीचा कार्यक्रम अधिक महत्त्वाचा वाटत आहे. घरात बसून दुष्काळ कसा जाहीर करावा, याचे सल्ले देण्यापलीकडे त्यांनी काही केले नाही, अशी शब्दात ठाकरेंकडून होणार्या टिकेला प्रत्युत्तर दिले.

ऊस, फळबागांसह सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांच्या सूचना…

जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी पंढरपूर आणि सांगोला तालुक्यांत थेट शेताच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. सांगोला तालुक्यातील कटफळ येथे भेट देऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना गोरे म्हणाले, “दुष्काळामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे १०० टक्के सरसकट पंचनामे करण्यात यावेत. यामध्ये नेहमीच्या पिकांसोबतच ऊस, फळबागा आणि अन्य सर्व बाधित पिकांचा समावेश करावा. एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेत अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीची अचूक नोंद घ्यावी, अशा सूचना दिल्या.

पंढरपूर तालुक्यातील गार्डी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी कासाळ ओढ्यावरील तलावात तातडीने पाणी सोडण्याच्या सूचना त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना दिल्या. तसेच गुरसाळे येथे भेट देऊन त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत विविध निवेदने स्वीकारली.या पाहणी दौऱ्यावेळी सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, शहाजी पाटील, प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी अमित माळी, सचिन इथापे, तहसीलदार बाळूबाई भागवत, सचिन लंगुटे, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव, गटविकास अधिकारी अमोल जाधव व योगेश कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.