सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप जिल्ह्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला असला तरी अपेक्षित यश मिळाले नाही, हे वास्तव आहे. एकहाती सत्तेसाठी सामूहिक प्रयत्न करूनही आम्ही कमी पडलो. जिल्ह्यात पक्षाची ताकद मोठी असतानाही बहुमताची संख्या गाठता आली नाही, तरी देखील जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार, असा ठाम विश्वास ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज जिल्ह्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार सोहळा आयोजित केला होता, त्या वेळी ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, माजी आमदार मदन भोसले, धैर्यशील कदम, जिल्हा परिषद सदस्या प्रिया शिंदे, विक्रम पावसकर, सुनील काटकर उपस्थित होते.

गोरे म्हणाले, “जिल्ह्यात भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरेल, असा संकंल्प केला होता. जिल्ह्यात भाजपची जी ताकद आहे तेवढे यश मिळाले नाही, तरी देखील आमचे नेतृत्व जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी करणार आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व शक्ती एकवटल्या होत्या. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा लोकांनीही भाजपचे विरोधात प्रचार करून पराभव केला आहे. अशा घटनांचा भविष्यात विचार केला जाणार असून, त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असा अप्रत्यक्ष इशारा जयकुमार गोरे यांनी दिला.

तरी देखील भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कुठलीही कसर न ठेवता जिल्ह्यात ताकद दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपला यश मिळाले आहे. भाजप हा पराभूत झाला नसून, अपेक्षित यश मिळाले नाही, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे काही मतदारसंघात सहानुभूतीचाही परिणाम झाला.”

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “भाजप हा विकासाचा पक्ष म्हणून जनतेची मान्यता आहे. जिल्हा परिषदेत भाजप सात सदस्य संख्येवरून २७ पर्यंत वाढला आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच भाजप जिल्हा परिषदेत सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. जिल्ह्यात तीन पंचायत समित्यांमध्ये भाजपची सत्ता आली असून, पुढील काळात संघटन बळकट करून भाजपला गावागावांत पोहोचविणार आहे.”

डॉ. भोसले म्हणाले, “झेडपी व पंचायत समिती निवडणुकीत भाजप सत्तेत नको म्हणून अनेक ठिकाणी सुप्त युती समोरच्या पक्षामधून झाल्या, तरी देखील भाजपला जनतेने स्वीकारल्याचे निकालावरून दिसून येते.