राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले ही चिंतेची बाब बनली होती. पत्रकार संरक्षण कायदा व्हावा यासाठी पत्रकारांकडूनही मागणी ते आंदोलन असा प्रवासही सुरू होता. या घटनेची दखल घेऊन राज्य शासनाने पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. यातील त्रुटी दूर करून सर्वसमावेशक कायदा करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन आमदार सुरेश हाळवणकर यांनी रविवारी केले.
राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला. अशा प्रकारचा कायदा व्हावा याकरिता आमदार हाळवणकर यांनी सन २०१२ मध्ये अशासकीय विधेयक दाखल केले होते. त्यानंतरही त्यांचे याबाबतचे प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना फळ येऊन प्रत्यक्षात हा कायदा सभागृहात मंजूर झाला आहे. त्यांनी केलेल्या या प्रयत्नांबद्दल पत्रकारांच्या वतीने आमदार हाळवणकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार कक्षात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी इचलकरंजी प्रेस क्लबचे अध्यक्ष दयानंद लिपारे, इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुभाष भस्मे यांच्या हस्ते आमदार हाळवणकर यांचा शाल, श्रीफळ व पत्रकारांचे प्रतीक असलेली लेखणी देऊन सत्कार करण्यात आला. कायदा मंजूर करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सभागृहातील सर्व सदस्यांचे अभिनंदन करणारा ठराव या वेळी संमत करण्यात आला. भाळसाहेब फास्के यांनी स्वागत तर रामचंद्र ठिकणे यांनी प्रास्ताविक केले. दयानंद लिपारे या कायद्यातील प्रवासाचा आढावा घेतला. सुभाष भस्मे यांनी आभार मानले.
