लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू स्वप्नील कुसाळेच्या यशाबद्दल जिल्ह्यात आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नेमबाजपटू स्वप्नील सुरेश कुसाळने पॅरिस ऑलिम्पिक पदक जिंकले. त्याने कांस्यपदक जिंकताच केवळ कोल्हापूर नव्हे तर संपूर्ण देशात आनंदोत्सव सुरू झाला आहे. तब्बल ७२ वर्षांनी ऑलम्पिक मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदक मिळवले. भवानी मंडप येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा कीर्ती स्तंभाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते पुष्पहार घालून कुसाळेच्या यशाबद्दल आनंदोत्सव साजरा केला.

युवासेनेचा आनंदोत्सव

स्वप्नील सुरेश कुसाळे याने पॅरिस येथे केलेल्या पराक्रमाबद्दल कोल्हापूर युवासेनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे युवासेनेकडून आतषबाजी करून नागरिकांना साखर वाटली. यावेळी भारतमाता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

आणखी वाचा-कोल्हापूरकरांच्या क्रीडा प्रेमात ऑलिम्पिक पदकाचा गौरव

कुमारवयात असताना स्वप्नीलच्या हाती रायफल आली. हळूहळू त्याने अचूक वेध घ्यायला सुरुवात केली. ऑलिम्पिकमध्ये यश मिळवण्याचे तेव्हा पाहिलेले स्वप्न आज त्याने प्रत्यक्षात उतरवले. प्रतिकूल परिस्थिती असतानाही जिद्द, ध्येय, चिकाटी, अहर्निश कष्टाची तयारी असेल, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही आपली मुद्रा उमटवता येते, हे एका छोट्या खेड्यातून आलेल्या स्वप्नील कुसाळेने स्वकर्तृत्वाने दाखवून दिले आहे. त्याचा हा प्रवास संघर्षातून यशाची प्रचिती देणारा ठरला आहे.

स्वप्नील मूळचा कांबळवाडी गावचा. राधानगरी तालुक्यातील हे हजारभर लोकवस्तीचे छोटेखानी खेडे आवर्जून नोंद घ्यावे असे काही नव्हते. तसे हे गाव यापूर्वी लोकांच्या लक्षात आले ते २०१२मध्ये राज्यस्तरीय स्वच्छता अभियानात प्रथम आल्यामुळे. त्यानंतर या गावात जगाचे लक्ष वेधले जावे असे काही घडले नाही. जे घडले तेच मुळी आज स्वप्नीलने साधलेल्या अचूक नेमबाजीमुळे.

आणखी वाचा-स्वप्निल कुसाळेचे पालकमंत्री, खासदार यांच्याकडून अभिनंदन; आमदार पाटलांकडून पाच लाखांचे बक्षीस

कोल्हापूरला नेमबाजांची परंपरा आहे. तेजस्विनी सावंत, राही सरनोबत यांनी या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्याच्या पुढचे पाऊल आज स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल ‘थ्री पोझिशन’ प्रकारात कांस्यपदक पटकाविले. स्वप्नील नववीत असताना नेमबाजी खेळाकडे आकर्षित झाला. पुढे त्याने नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलमध्ये याचे धडे गिरवले. या खेळात त्याला यश मिळू लागले. मग त्याने बालेवाडीतील क्रीडा संकुल गाठले. नेमबाजी खेळाचा शास्त्रोक्त आणि मोठ्या गुणवत्तेचा सराव सुरू केला. या काळातच दीपा देशपांडे यांच्यासारख्या क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन त्याला प्राप्त झाले. त्यानंतर स्वप्नीलची या खेळातील प्रगती उत्तरोत्तर उंचावत गेली. विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपले कौशल्य सिद्ध करतानाच आज त्याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला कांस्यपदक मिळवून दिले.

आर्थिक अडचणींवर मात

अर्थात हा प्रवास तसा सोपा नव्हता. तो स्वप्नीलच्या जिद्द, ध्येयाचे प्रत्यय घडवणारा आणि अडचणींवर मात करत पुढे कसे जायचे याचा संदेश देणारा होता. नेमबाजी हा आर्थिकदृष्ट्या अत्यंत महागडा खेळ आहे. नुसत्या गोळ्या वापरायच्या तरी त्यासाठी रोजचा खर्च हजारांच्या घरात जाणारा. या खर्चाने श्रीमंत घरातील लोकही या खेळात हात आखडता घेत असतात. सुरुवातीच्या काळात गोळ्या घेण्यासाठीही अडचणी येत होत्या. कुसाळे या मध्यमवर्गीय वर्गातील कुटुंबाला तर हा खर्च तसा परवडणारा नव्हता. खेळापासून विचलित व्हावा असा प्रसंग येत होता. पण त्याच्या पाठीशी कुटुंबीय खंबीरपणे उभे राहिले. स्वप्नीलची राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी सुधारत गेली, तसतसे त्याला कुटुंबीयांनी सर्वतोपरी मदत केली. शिक्षक असलेले वडील सुरेश कुसाळे आणि सरपंच असलेली आई अंजली कुसाळे यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांच्या पाठबळामुळेच स्वप्नीलने पॅरिसमध्ये तिरंगा फडकविला आहे.