दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांची भूमिका एक आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा वेगळी; असे भिन्न चित्र केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यात दिसून आले. लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये कमळ निश्चित फुलेल, असा विश्वास मंत्री शिंदे यांनी व्यक्त केला असला तरी जिल्ह्यातील खासदारांचे जागावाटप पाहता हे घडणार कसे, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. लोकसभा- विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला निम्म्या जागा मिळाव्यात, ही कार्यकर्त्यांची अपेक्षा फलद्रूप होणार का, हाही प्रश्न आहेच.

Vanchit Bahujan Aghadi, Yavatmal,
यवतमाळमध्ये ‘वंचित’चे बळ नवख्या पक्षाच्या उमेदवारास
Buldhana Lok Sabha, queueless voting,
बुलढाणा लोकसभा निवडणुकीत यंदा ‘रांगविरहित मतदान’! काय आहे योजना जाणून घ्या…
BSP, Nagpur, Ramtek, BSP Nagpur,
नागपूर, रामटेकमध्ये बसपाच्या मतांना ओहोटी, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत…
loksatta editorial Supreme court descion regarding candidate affidavit on asstets
अग्रलेख: अपवादांचा अपराध!

लोकसभा निवडणुकीच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारीला सुरू केली आहे. राज्यातील १८ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केले असून तेथे केंद्रीय मंत्र्यांचे निवासी दौरे आयोजित केले आहेत. जिल्ह्यात यापूर्वी केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश तसेच केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल यांचा दौरा झाला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचे कोल्हापूरशी असलेले जुने घनिष्ठ संबंध आणि मराठी भाषा ही कार्यकर्त्यांना अधिक जवळची बाब असल्याने त्यांच्याकडे कोल्हापूरची जबाबदारी सोपवण्याची कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण झाली आहे. मंत्री शिंदे आता जिल्ह्यात भाजपचा संघटनात्मक विस्तार करण्यावर भर देऊ लागले असल्याचे त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात दिसून आले.

भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद मेळाव्यात मंत्री शिंदे यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावभावना उल्लेखनीय ठरल्या. केंद्रात व राज्यात भाजपचे दुसऱ्यांदा सरकार आले आहे. देशभर भाजप वेगाने विस्तारतो आहे. मात्र कोल्हापुरात कमळ फुलण्याची अपेक्षित गती दिसत नाही. किंबहुना लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची स्थिती शून्यवत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यात भाजपचे लोकप्रतिनिधी संसद, विधानसभेत पोहोचावेत, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असली तरी जागावाटप ही त्यांची दुखरी नस बनली आहे.

कमळ फुलणार तरी कसे?

राज्यात भाजप-शिंदे गटाचे सरकार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जागांबाबत प्रथम राज्यातील नेते चर्चा करतील आणि वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करून मंत्री शिंदे यांनी सध्या आपण संघटनात्मक बाबीवर अधिक लक्ष देणार असल्याचे नमूद केले होते. लोकसभा निवडणुका भाजप व शिंदे गट एकत्रित लढणार असल्याचे राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. परिणामी कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळणार हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असल्याने लोकसभेला भाजपचे कमळ फुलणार तरी कसे? असा प्रश्न कार्यकर्त्यांनाही पडला आहे.

विसंवाद दूर करण्याची कसोटी

हीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीवेळीही उद्भवू शकत असल्याने इच्छुक कमालीचे अस्वस्थ आहेत. त्यातूनच लोकसभेला नाही किमान विधानसभेला तरी निम्म्या जागा भाजपला मिळाल्या पाहिजेत यासाठी इच्छुकांनी आतापासूनच जोर लावायला सुरुवात केली आहे. त्यांचे समर्थकसुद्धा हीच भूमिका केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर हिरिरीने मांडताना दिसत आहेत. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये भाजपला जागावाटपात अधिक जागा मिळत असतात. तुलनेने शिंदे गटाला (पूर्वी ठाकरे गट) कमी जागा मिळतात. जागावाटपातील हे सूत्र समजावून सांगत कोल्हापूरच्या जागावाटपबाबत कार्यकर्त्यांनी सबुरीने राहावे, असा सल्ला कार्यकर्त्यांना खासगीत दिला जातो.

कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढीस

गेल्या निवडणुकीवेळी लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेकडे होत्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याच्या जिद्दीने दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मोठे परिश्रम घेतले होते. विधानसभा निवडणूकवेळी १० पैकी दोन जागा भाजपच्या वाटय़ाला आल्या. अन्यत्र भाजपला शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा वाहावी लागली. विधानसभेच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला. भाजपची देशभर प्रगती होत असताना आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रतिनिधित्व वाढले पाहिजे, अशा अपेक्षा शिंदे यांच्याशी झालेल्या संवाद मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. लोकसभा- विधानसभेच्या निम्म्या जागा भाजपला मिळाल्या पाहिजेत, अशी आग्रही मागणी केली.