कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीत शिवबंधन बांधलेले राधानगरीचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. २३ मे रोजी ते राष्ट्रवादीत स्वगृही परतणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे. कार्यकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी विनाअट राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.

मागील ४० वर्षांच्या राजकीय व सामाजिक कार्यकाळात आपण नेहमीच कार्यकर्त्यांना जपण्याचे काम केले आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीने आपल्याला काही निर्णय घ्यावे लागले. परंतु आता आपल्या कार्यकर्त्यांना स्वास्थ्य देण्यासाठी आणि त्यांचा माझ्यावरील विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी विनाअट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली.

माजी आमदार के. पी. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. याबाबत मुदाळ येथे आज पत्रकार परिषदेत त्यांनी यावर भाष्य करीत आपला राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित झाला असल्याचे सांगितले.

मानसिकता राष्ट्रवादीचीच१९८५ सालापासून राजकीय जीवनात काम करताना माझ्यासोबत ८० ते ९० हजार लोक नेहमीच सोबत राहिले आहेत. त्यांना पाठबळ देण्यासाठी गावोगावी सहकारी संस्था उभारल्या असून सक्षमपणे सुरू आहेत. अजित पवार यांनी मी कोणत्याही पक्षात असलो तरी मला सातत्याने मार्गदर्शन, सहकार्य केले आहे. मी जरी प्राप्त राजकीय परिस्थितीत शिवसेनेकडून उमेदवारी घेतली असली तरी माझ्या कार्यकर्त्यांची मानसिकता राष्ट्रवादीतच राहण्याची असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हसन – किसन पुन्हा एकत्र

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि माझी मैत्री सर्वश्रूत आहे. कितीही राजकीय अडथळा आला तरी मैत्री तुटू दिलेली नाही. त्यांच्यासारखे सहकार्य, जवळीकता अन्य पक्षात मिळणे शक्य नसल्याने त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. हसन-किसनची जोडगोळी पुन्हा एकत्र येत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे, असा उल्लेख पाटील यांनी केला. बिद्री कारखान्याचे संचालक पंडितराव केणे, माजी सभापती विश्वनाथ कुंभार, प्रा. एच. आर. पाटील, मच्छिंद्र मुगडे उपस्थित होते.