कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गात अडथळा निर्माण करणारे विद्युत खांब हटविण्याच्या दृष्टीने महावितरणच्या माध्यमातून सर्वेक्षण करणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांना कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला.केनवडे गावाच्या परिसरात दोन कर्मचारी मोबाइल मॅपद्वारे सर्वेक्षण करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गात अडथळा ठरणारे विद्युत खांब किती आहेत याबाबत माहिती संकलन करत असल्याचे सांगितले. त्यावर श्रीकांत चव्हाण, अमोल डाफळे, प्रकाश पाटील, साताप्पा लोंढे, संतोष पोवार, दादासो पाटील, योगेश कुळोमोडे, आनंदा पाटील यांसह केनवडे व्हनाळी, खेबवडे, एकोंडी परिसरातील शेतकरी आक्रमक झाले.
घटनास्थळी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले. त्यांनी सर्व्हे थांबवत असल्याचे सांगितले. संतप्त शेतकऱ्यांनी शक्तिपीठ प्रकल्पाला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध असताना त्यांना डावलून काम केले जात असल्याबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारला.
छुप्या हालचाली सुरू
कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्ग होणार नसल्याचे जाहीर करूनही यापूर्वी ड्रोनद्वारे आणि आता प्रत्यक्ष सर्व्हे केला जात आहे. शेतकऱ्यांना अंधारात ठेवून शक्तिपीठ महामार्गासाठी छुप्या हालचाली सुरूच असल्याने शेतकऱ्यांनी बेसावध न राहता एकसंध होऊन सतर्क राहावे, असे आवाहन शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे शिवाजी मगदूम यांनी केले आहे.
सर्व्हेसाठी उद्दिष्ट
शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प होऊ नये यासाठी शेतकरी लढत असले तरी शासनाकडून हा मार्ग लादण्याचा खटाटोप सुरूच आहे. महावितरणने दररोज १७ किमी अंतराचा सर्व्हे पूर्ण करून माहिती देण्यास सांगितले असल्याचे या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.