कराड : मलकापूर (ता. कराड) येथील हॉटेल अयोध्या लॉजिंगवर पोलीस उपाधीक्षकांचे पथक, निर्भया पथक व कराड शहर पोलिसांनी छापा टाकला. यात देहविक्री प्रकरणी बांगलादेशी महिलेसह चार महिलांना ताब्यात घेण्यात आले. ही घुसखोर बांगलादेशी महिला बनावट आधारपत्रिका बनवून वास्तव्य करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बांगलादेशातून भारतात घुसखोरी करून, बनावट आधारपत्रिका बनवून वास्तव्य करणारे चौघेजण नुकतेच अटक करण्यात आले असताना, देहविक्रीच्या गुन्ह्यात अशाच प्रकारे बांगलादेशातून घुसखोरी करून, आलेली व बनावट आधारपत्रिकेच्या आधारावर देहविक्रीच्या व्यवसायासाठी वास्तव्यास असलेली एक बांगलादेशी सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे बनावट आधारपत्रिकेची साखळी असण्याची खात्री व्यक्त होत असून, महसूल प्रशासन व पोलिसांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलिसांची माहिती अशी की, याप्रकरणी संबंधित लॉज मालक अक्षय शरद पुजारी (२७ रा. मंगळवार पेठ, कराड) याचेवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मलकापूरमध्ये अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील यांना मिळाली होती. यावर त्यांनी निर्भया पथक, पोलीस उपाधीक्षक पथक व कराड शहर पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा आंबले, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे फौजदार निखील मगदूम, अमित बाबर यांच्या संयुक्त पथकाने बनावट गिऱ्हाईक संबंधित हॉटेल अयोध्या लॉजिंगवर पाठवून तिथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्री करून घेतली. आणि त्यानंतर या लॉजिंगवर छापा टाकला असता, त्यावेळी लॉजिंगचा चालक अक्षय पुजारी हा तेथील सर्व व्यवहार पाहत असल्याचे समोर आले. लॉजमधील खोल्यांच्या झडतीत चार महिला वेश्या व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. या चार जणींपैकी एक महिला बांगलादेशी असुन , ती बेकायदा घुसखोरी करून, बोगस आधारपत्रिके आधारे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिच्याकडील दोन भ्रमणध्वनी संच, आधारपत्रिका जप्त केली आहे.

बांगलादेशी महिलेने मुंबईतून दुसऱ्या नावाने म्हणजेच बोगस आधारपत्रिका बनवून ती कराडमध्ये वास्तव्य करीत होती. पोलीस तपासात तिने तिच्या मूळ नावाची कबुली दिल्याने कराडमध्ये अजून किती बांगलादेशी दडलेत, ते कुठे राहतात, त्यांचे व्यवसाय काय, याबाबत उलटसुलट चर्चा आहे. लोकांमधून याबाबत चिंता व्यक्त होत आहे.