कराड : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड येथे उभारण्यात आलेल्या एक खांबी ( सिंगल पिलर ) साडेतीन किलोमीटरच्या उड्डाणपुलावरील पथदिवे अखेर कार्यान्वित झाल्याने हा भव्य उड्डाणपूल रात्रीच्या वाहतुकीसाठीही खुला करण्यात आला आहे.

महामार्ग प्रशासन व ठेकेदार कंपनीने तात्पुरत्या स्वरूपात जनरेटरच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरू केल्याने रात्रीच्या वेळी जुन्या कोयना पुलापासून नांदलापूरपर्यंत सेवा रस्त्यावरून होणारी प्रचंड वाहतूक कोंडी आता टळली असून, वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.उड्डाणपुलावरील पथदिव्यांना सध्या तात्पुरत्या स्वरूपात जनरेटरद्वारे वीजपुरवठा करण्यात येत आहे. कोयनापूल ते नांदलापूर दरम्यान, तीन ठिकाणी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री पथदिव्यांची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर शनिवारी सायंकाळपासून पथदिवे प्रत्यक्ष कार्यान्वित करून उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या. उड्डाणपुलावरील पथदिवे सुरू नसल्याने आतापर्यंत या पुलावरून केवळ दिवसा वाहतूक सुरू होती. रात्रीच्या वेळी पूल बंद ठेवण्यात येत असल्याने सेवा रस्त्यावरून वाहतूक वळवावी लागत होती. त्यामुळे सेवा रस्त्यावर ताण घेऊन वाहतूक कोंडीची समस्या कायम होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना उड्डाणपूल अपूर्ण कामे असताना घाईघाईने खुला केल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमीवर यंत्रणेने तातडीने जनरेटरची व्यवस्था करून पथदिवे सुरू केले आहेत. कायमस्वरूपी वीजपुरवठा ‘महावितरण’कडून घेण्यात येणार असून आवश्यक परवानग्या मिळताच तो सुरू केला जाणार आहे.

(वाहतूक कोंडीचे ग्रहण सुटल्याने ‘विकेंड’ झाला सुकर!)

पुणे- बंगळुरू महामार्गावर शनिवार आणि रविवारी तसेच सलग सुट्ट्यांच्या कालावधीत पर्यटकांची व लांब पल्ल्याच्या वाहनांची प्रचंड वर्दळ असते. आतापर्यंत रात्री उड्डाणपूल बंद असल्याने सर्व वाहतूक जुन्या कोयना पुलावरून सेवा रस्त्यावर वळवली जात होती. यामुळे अवजड वाहने आणि स्थानिक वाहतूक एकाच रस्त्यावर येऊन मैलोंमैल रांगा लागत असत. मात्र, यंदाच्या विकेंडला उड्डाणपूल रात्रीही खुला राहिल्याने ही कोंडी कायमची सुटली असून विकेंडला बाहेर पडलेल्या वाहनधारकांचा प्रवास अत्यंत सुखकर व गतीमान ठरला आहे.

(राजकीय टीकेनंतर महामार्ग यंत्रणा सक्रिय)

अपूर्ण कामांअभावी उड्डाणपुलावर रात्रीची वाहतूक रोखल्याने प्रवाशांचे हाल होत होते. यावर सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई पत्रकार परिषदेत महामार्ग विभागाच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. पालकमंत्र्यांच्या या इशाऱ्यानंतर महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदार कंपनीने तातडीने हालचाली करत जनरेटरची सोय करून उड्डाणपूल उजळवून टाकला आहे.

(पथदिव्यांचा ‘बंद-चालू’ खेळ अन् वाहनधारकांत संभ्रम)

जनरेटरवर अखंड भार येऊ नये म्हणून महामार्ग प्रशासनाने पथदिवे टप्प्याटप्प्याने आलटून- पालटून सुरू ठेवण्याची शक्कल लढवली आहे. मात्र, या ‘बंद-चालू’ खेळामुळे वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. प्रकाश नसताना काही वाहने सेवा रस्त्याकडे वळतात, तर दिवे सुरू दिसताच वाहने पुलावर चढतात. त्यामुळे अचानक ब्रेक दाबल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

( ‘महावितरण’च्या परवानगीची प्रतीक्षा)

जनरेटर हा केवळ तात्पुरता पर्याय असून, उड्डाणपुलासाठी कायमस्वरूपी उच्चदाब वीजपुरवठ्याची गरज आहे. महावितरणकडे आवश्यक मंजुरी आणि परवानग्या मिळण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. जोपर्यंत ‘महावितरण’चा अधिकृत वीजपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत जनरेटरचा खर्च प्रशासनाला करावा लागणार असून,एक सलग उजळणाऱ्या पथदिव्यांसाठी ‘महावितरण’ची वीज मिळण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

(स्थानिकांसह प्रवाशांकडून स्वागत)

कराड शहरातील अंतर्गत वाहतुकीवर राष्ट्रीय महामार्गाच्या कोंडीचा थेट परिणाम होत होता. सेवा रस्त्यावरील वाहतूक उड्डाणपुलावर गेल्याने कराड शहर, कोयना वसाहत आणि नांदलापूर, ढेबेवाडी फाटा, वारुंजी टिकाटणे परिसरातील स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवस रात्र, वाहतूक कोंडी, अपघात, ध्वनी आणि वायू प्रदूषणातून सुटका झाल्याने सर्वस्तरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.