कराड : पावसाच्या सलग दमदार हजेरीमुळे कराड तालुक्यात खरिपाचे ७० हजार ९८७ हेक्टर क्षेत्र (९२.६ टक्के) पेरणीखाली आले आहे.
नैऋत्य मोसमी पावसाने सुरुवातीलाच म्हणजे अवघ्या जून महिन्यात दिलेली ओढ दूर झाल्याने भात, सोयाबीन, मका व भुईमूग पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा भुईमुगाची पेरणी लक्ष्यापेक्षा अधिक (११०.६%) झाली असून, उसाची लागवडही ६८.२ टक्के पूर्ण झाली आहे. वेळेत झालेल्या या पावसाचा थेट फायदा शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाच्या रूपात होणार आहे.

​( पिकांना मोठा दिलासा )

​कराड तालुक्यात पावसाच्या पुनरागमनाने भात, सोयाबीन, भुईमूग व उडीद पिकांच्या वाढीस वेग आला असून, सुकणाऱ्या पिकांना नवजीवन मिळाले आहे. सरासरीपेक्षा अधिक पावसाने ‘एल निनो’ आणि कमी पावसाचे मळभ हटले असून, जलस्रोत खळखळून वाहताना, छोटे व मध्यम स्वरूपाचे जलसाठे तुडुंब भरून वाहिले आहेत.

​(खरिपाची व पिकांची टक्केवारी)

​एकूण ७६,६२२ हेक्टरपैकी ७०,९८७ हेक्टरवर (९२.६ टक्के) पेरणी पूर्ण झाली आहे. यात भुईमूग ११०.६,टक्के, भात व सोयाबीन प्रत्येकी ८७.३ टक्के आणि ऊस लागवड ६८.२ टक्के झाली आहे.

( कृषी सल्ला )

​तालुक्यातील ७९,५१२ हेक्टर लागवडीयोग्य जमिनीवर वेळेत झालेला पाऊस हा एकूणच पिकांसाठी पोषक ठरेल, असा विश्वास कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी व्यक्त केला आहे.

( हिरवीगार सुखद चित्र )

उत्तम पाऊस, वधारलेले जलसाठे, घाटमाथ्यावर सुरू असलेली जोरदार पर्जन्यवृष्टी, जणू हिरवी चादर पांघरून नयनरम्य बसलेले डोंगर आणि हिरवीगार शेतीशिवार असे समाधानकारक व सुखद चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.