कराड : ‘कराड दक्षिण’च्या सहकार आणि राजकीय वर्तुळात काही दिवसांपासूनच्या पडद्यामागील घडामोडींना आता उघडपणे गती मिळाली आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी सहकार पॅनेलने तडजोड, सामंजस्य आणि ‘मैत्रीचा सिलसिला’ कायम ठेवला आहे. त्यात उंडाळकर गटाची ताकद भोसले गटाच्या पाठीशी उभी राहत असल्याने विरोधी अविनाश मोहिते कुटुंबीय व त्यांचे संस्थापक पॅनेल नेत्यांविना एकाकी पाडण्याची रणनीती पुढे आली आहे.
‘कृष्णा’च्या सभासदांवर प्रभाव असणारे नेते माजीमंत्री जयंत पाटील, डॉ. विश्वजित कदम यांच्यासह अनेकांच्या सदिच्छा भेटीनंतर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि त्यांचे पुत्र आमदार डॉ. अतुल भोसले यांनी अनेकांशी सामंजस्य साधल्याचे समोर आले. ‘कृष्णा’चे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या रयत संघर्ष मंचच्या जाहीर पाठींब्यानंतर आता थेट उंडाळकर गटाचे बळ मिळवण्याची खेळी यशस्वी झाल्याने भोसले पितापुत्रांचे नेमके चाललयं तरी काय, याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. तर, विरोधकांची ताकद मर्यादित असताना, भोसलेंचा हे तडजोडनामे कशासाठी, हा प्रश्नही सातवल्याखेरीज राहत नाही.
कोयना दूध संघाच्या आवारातील रयत संघटनेच्या मेळाव्यात डॉ. सुरेश भोसले यांनी ‘रयत’चे नेते अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना जिल्हा बँकेसह त्यांच्याकडील सहकारी संस्थांमध्ये सहकार्याचे आश्वासन दिले. बदल्यात, उदयसिंहांनीही कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनेलला रयत संघटनेचा पाठिंबा दिला आहे.
माजी आमदार (कै.) जयवंतराव भोसले आणि माजीमंत्री (कै.) विलासकाका उंडाळकर यांनी दिलेला शब्द जपण्याची परंपरा आम्ही पुढे नेत आहोत. उदयसिंहांना दिलेला शब्द कधीही पडू देणार नसल्याची ग्वाही डॉ. सुरेश भोसले यांनी दिली आहे.
तडजोड, सामंजस्याचे राजकारण
या घडामोडींकडे केवळ एका निवडणुकीपुरते न पाहता, राजकारणातील एका मोठ्या ‘पायंड्याची’ सुरुवात मानली जात आहे. परस्परांच्या संस्थांमध्ये ‘नो एन्ट्री’च्या नव्या समीकरणांनुसार, ‘कोणीही कुणाच्याही सहकारी संस्थेत हस्तक्षेप करायचा नाही, अशी अलिखित तडजोड नेत्यांमध्ये आकारास येत असल्याचे दिसते आहे.
भोसले आणि उंडाळकर गटासह डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्यातील सामंजस्य पाहता अविनाश मोहिते आणि त्यांच्या संस्थापक पॅनेल विरोधकांत सारेच एकवटल्याचे गंमतीशीर चित्र आहे. ‘कृष्णा’च्या निवडणुकनिमित्ताने आकारास आलेली ‘सहकार मैत्री’ केवळ एकमेकांच्या संस्थात ढवळाढवळ करायचे नाही असे राजकीय समीकरण असल्याने सारेकाही एकतर्फी राहताना, प्रबळ विरोधकांअभावी सभासद आणि कार्यकर्त्यांचेही महत्व कमी होण्याची शक्यता आहे. एकूणच या बदलत्या राजकारणाचे परिणाम राजकीय जाणकारांसाठी अभ्यासाचा विषय ठरत आहे.
