कराड : अनंत चतुर्दशीच्या पावन पर्वावर कराड येथील कृष्णा घाटावर विसर्जन मिरवणुकीदरम्यान अन्नदानाची भव्य आणि अखंड परंपरा यावर्षीही उत्साहात पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक व सामाजिक कार्यकर्ते रणजीतनाना पाटील आणि मित्र परिवाराच्या वतीने सलग ११ व्या वर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळपासून सुरू झालेला हा उपक्रम पुढील दिवशी पहाटेपर्यंत, म्हणजेच शेवटच्या गणेश मंडळाच्या विसर्जनापर्यंत सलग २० तास अविरत सुरू होता. या अन्नदानाचा लाभ सुमारे ५० हजारांहून अधिक भाविकांनी घेतला. सकाळी घरगुती गणेश विसर्जनासाठी आलेल्या महिला व नागरिकांपासून ते सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते, पंचक्रोशीतील नागरिक, बंदोबस्तावरील पोलीस, शासकीय कर्मचारी आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांनी या प्रसादाचा आस्वाद घेतला. गर्दीचे नियोजन सुलभ व्हावे यासाठी गरमागरम शाकाहारी पुलाव, दालचा आणि पाण्याच्या बाटलीचे फूड पॅकेट्स वितरित करण्यात आले.
( मान्यवरांकडून कौतुक अन् प्रत्यक्ष सहभाग )
या सामाजिक उपक्रमाची दखल घेत राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी आणि प्रत्यक्ष सहभागासाठी जणू रांग लागली. कृष्णा घाटाला भेट देऊन रणजीतनाना पाटील यांच्या दातृत्वाचे भरभरून कौतुक करण्यात आले. भेट देणाऱ्या प्रमुख मान्यवरांमध्ये माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, हिंदकेसरी मल्ल संतोष वेताळ तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधी, नगरसेवकांचा समावेश होता. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून विसर्जन मिरवणुकीच्या काळात विनाखंड अन्नदान सेवा पुरवणे हा एक आदर्श आणि कौतुकास्पद सामाजिक उपक्रम असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. रणजीतनाना पाटील यांचे बंधू सचिन पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून संपूर्ण महाप्रसाद वितरणाच्या नियोजनाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.
( संघटन अन् अथक परिश्रम )
रणजीतनाना पाटील मित्र मंडळासह विविध संस्था व कार्यकर्त्यांच्या शिस्तबद्ध नियोजनाची ही कसोटी होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजेच ५० हजार लोकांच्या महाप्रसादाचे वितरण सुरळीत पार पाडण्यासाठी रणजीतनाना पाटील मित्र परिवारासह स्थानिक संस्थांनी अथकपणे परिश्रम घेतले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन पाटील, चंद्रकांत काशिद, सागर आमले, अजित थोरात, ॲड. दीपक थोरात, आशपाक मुल्ला, नितीन महाडीक, कल्पेश मुळीक, विशाल आचारी, राहुल बर्गे, महेश पाटील, दिलीप पाटील, सुहास गोतपागर, अभिजीत माने, किरण पाटील, प्रमोद जगदाळे, सर्जेराव पानवळ, स्वाती पिसाळ, अभय चव्हाण यांनी विशेष योगदान दिले. याशिवाय “आनंद विहार” जेष्ठ नागरिक संघ, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सर्व सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध सेवा देऊन या महाप्रसाद सोहळ्याचे शिवधनुष्य संघटितपणे पेलले.
