कराड : मलकापूर येथील बालगृहातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी कराड शहर पोलिसांनी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात बालगृहातील कर्मचारी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आढळल्यास शवविच्छेदन अहवाल आणि प्राथमिक तपासाच्या आधारे त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, बालगृहात वास्तव्यास असलेल्या १४ वर्षीय मुलाचा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारादरम्यान, मृत्यू झाला. दि. २७ ऑगस्ट रोजी बालगृहातील दोन मुलांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यादरम्यान झालेल्या मारहाणीनंतर या १४ वर्षीय मुलाला पाय आणि पोटदुखीचा तीव्र त्रास सुरू झाला. त्याला सुरुवातीला कृष्णा रुग्णालय व नंतर प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र शनिवारी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

या घटनेमुळे संतापलेल्या नातेवाईकांनी बालगृहाबाहेर आंदोलन करत सखोल चौकशीची मागणी केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी दत्तात्रय दराडे यांच्या मध्यस्थीनंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.पोलीस निरीक्षक दराडे यांनी सांगितले की, “मृत मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बालगृहातील आणि इयत्ता बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय संशयित मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणी, शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासावरूनच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.”

बालगृह समितीचे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्याबाबत जिल्हा महिला व बालकल्याण समितीला कळवले आहे. पोलिसांनी बालगृहातील आवश्यक रेकॉर्ड ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सचोटीने आणि निष्पक्ष तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे करत असल्याचे दराडे यांनी स्पष्ट केले.