कराड : शहरातील फेडरल बँकेशेजारील मोबाईल शॉपीचे शटर तोडून ३० लाख रुपये किमतीचे मोबाईल (भ्रमणध्वनी संच ) पळवणाऱ्या टोळीचा कराड शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

तांत्रिक विश्लेषण आणि तब्बल २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी कर्नाटकातील बंगळूरू येथून टोळीतील दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

चोरीचा गुन्हा व तपास चक्र

२१ ऑगस्टच्या पहाटे चोरट्यांनी मोबाईल शॉपीचे शटर तोडून नवीन मोबाईल लंपास केले. संशयित स्विफ्ट कारमधून शामगाव घाटाच्या मार्गाने पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून उघडकीस आले. पोलिसांनी शामगाव घाटापासून अहिल्यानगरपर्यंत सुमारे २०० ते २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. टोलनाके टाळून प्रवास करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी सीडीआर व एसडीआर या तांत्रिक यंत्रणेचा वापर करण्यात आला.

आंतरराज्यीय टोळीची कार्यपद्धती

अब्दुलहाय बशीरअहमद (वय ५१, रा. नूह मेवात, हरियाणा) आणि अलाऊद्यीन जहरुद्यीन (वय ३१, रा. गौतमबुद्धनगर, उत्तर प्रदेश) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ३१ ऑगस्ट रोजी बंगळूरू जिल्ह्यातील वस्कोटी परिसरातून कराड पोलिसांच्या पथकाने दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. ही टोळी मुळची हरियाणा- राजस्थानमधील असून, आधी स्थानिक साथीदारांमार्फत दुकानांची रेकी केली जायची. त्यानंतर चोरी करून इतर राज्यांत पोबारा केला जात असे. कराडातील चोरीनंतर हे आरोपी हरियाणात गेले आणि तेथून आंध्र प्रदेशमार्गे कर्नाटकात दाखल झाले होते.

पोलीस कोठडी व कारवाई

दोन्ही आरोपींना न्यायालयाने ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यासाठी आणि टोळीतील इतर फरार साथीदारांच्या अटकेसाठी पोलिसांचे एक पथक हरियाणा व राजस्थानकडे रवाना झाले आहे. पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, फौजदार निखील मगदूम व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे.