कराड : लोकशाहीचे पावित्र्य जपत आणि शहराच्या पुढील ५० वर्षांच्या दूरदृष्टीचा विचार करत पालिकेचा कारभार हाकलला जात असल्याची ठाम ग्वाही नगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी दिली. मात्र, विरोधी भाजप नगरसेवक ‘स्टंटबाजी’ करत आमदारांचा चांगुलपणा मिळवण्यासाठी सर्वांचीच दिशाभूल करत असून, कराडच्या विकासात विघ्न आणण्याची खेळी करत असल्याची जोरदार टीका नगराध्यक्ष यादव यांनी पत्रकार परिषदेत केली. सत्ताधारी आघाडीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नावाचा वापर करून केवळ विकासकामांचे केविलवाणे श्रेय लाटण्याचा आणि जनतेची दिशाभूल करण्याचा विरोधकांचा बनाव असल्याचे सांगत, याबाबत राजेंद्र यादव यांनी काही कागदोपत्री दाखले देत, आपली बाजू लावून धरली. विरोधी नगरसेवकांचा हा प्रकार आमदारांच्या लक्षात येत नसावा, त्यांना चुकीची माहिती दिली जात असावी. मात्र, कराड शहराच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाच्या भूमिकेचे स्वागत असल्याचे नगराध्यक्ष यादव यांनी सांगितले.
कराड पालिकेच्या सभेत सादर ११४ विषयांपैकी अर्ध्याहून अधिक विषय विरोधकांचेच असताना, ते प्राधान्याने मंजूर करण्यात आले. मात्र तरीही आमदारांनी प्रास्तावित केलेल्या प्रकल्पांना आम्ही सत्तेच्या माध्यमातून खो घालतो असा खोटा आव आणणाऱ्या विरोधी गटनेते विजय वाटेगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांवर यादव यांनी जोरदार टीका केली.
आमदार डॉ. अतुल भोसलेंच्या माध्यमातून प्रस्तावित ‘नेकलेस रोड’ आणि उद्यानाच्या प्रस्तावाबाबत प्रशासकीय अहवाल व तांत्रिक त्रुटींची पूर्तता न करता केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी घाई होत असल्याचीही टीका नगराध्यक्षांनी केली. यावर त्यांनी कायदेशीर बाजू आणि प्रशासकीय अडचणीही मांडल्या.
शहरात हरित पट्ट्यासोबतच पालिकेच्या उत्पन्नासाठी व्यापारी संकुल उभारणे हे शहरहिताचे असताना, त्याला विरोधकांकडून जाणीवपूर्वक खो घालण्याची स्वार्थी भूमिका घेतली जात असल्याचाही आरोप राजेंद्र यादव यांनी केला.
श्रेयासाठी केविलवाणा प्रयत्न!
”आमदारांच्या निधीचे स्वागतच आहे, पण केवळ त्यांच्या नजरेत भरण्यासाठी भ्रामक चित्र निर्माण करणे थांबवावे. विरोधकांना समित्यांमध्ये योग्य स्थान देऊनही ते दिशाभूल करत आहेत. आमदारांपर्यंत योग्य माहिती न पोहोचल्यानेच हे गैरसमज पसरवले जात आहेत.”- नगराध्यक्ष राजेंद्र यादव
‘स्वच्छ सर्वेक्षण’ आणि चार कोटींचा निधी रोखणारे कोण?
गत प्रशासकीय काळात शहराच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाला होता. अण्णाभाऊ साठे योजनेतील शहराच्या हक्काचा चार कोटी रुपयांचा निधी भाजप नगरसेवकांच्याच अडेलतट्टूपणामुळे रखडला. शहराच्या ५० वर्षांच्या भविष्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यास पालिका कटिबद्ध असल्याची ग्वाही यादव यांनी दिली.
पावित्र्य जपण्यासाठीच गॅलरी बंद!
पालिकेच्या सभेत बाहेरील कार्यकर्त्यांना आणून गोंधळ घालण्याचा आणि लोकशाहीच्या परंपरेला बट्टा लावण्याचा विरोधकांचा कट होता. सभागृहाची शिस्त, गौरव आणि दिवंगत नेत्यांच्या विचारांचे पावित्र्य राखण्यासाठीच प्रेक्षक गॅलरी बंद ठेवण्याचा कठोर व ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचे खळबळजनक प्रतिपादन नगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी या वेळी केले.
व्यापारी संकुलातून खदखद
शहरात तीन व्यापारी संकुले उभारण्यासाठी सत्ताधारी मंडळी शासनाकडे आग्रही आहेत. तर, यातील एका मोठ्या भूखंडावर व्यापारी संकुलाऐवजी सुसज्ज बगिच्या व्हावा अशी भाजप नगरसेवकांची जोरदार मागणी आहे. कराडमध्ये होणार्या या तीन भव्य व्यापारी संकुलाचे अर्थकारणच सध्याच्या संघर्षांत दडल्याची चर्चा राजकीय आणि पालिकेच्या वर्तुळात होताना दिसत आहे.
टीका, आरोपांच्या उत्तराकडे लक्ष
आमदार डॉ. अतुल भोसलेंच्या ड्रीम प्रॉजेक्टला तूर्तास तांत्रिक स्थगिती मिळाल्याने खळबळ उडाली असताना, आणि या पार्श्वभूमीवर सुरुवातीला विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर टीका, आरोपांची राळ उडाली आहे. त्यामुळे विरोधी भाजपचे नगरसेवक आता काय प्रत्युत्तर देतात, काय बाजू मांडतात आणि या साऱ्यातून कराडकरांच्या पदरात काय पाडणार याची सर्वत्र चर्चा आहे.
