कराड : ​सध्याच्या प्रतिकूल हवामानामुळे भात पिकावर कडा करपा आणि पानावरील अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अशा काळात संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तालुक्यातील कोपर्डे हवेली व लगतच्या परिसरातील प्रगतशील शेतकऱ्यांनी ड्रोन तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा अत्यंत वेगाने आणि प्रभावीपणे कीटकनाशकांसह शक्तिवर्धक औषधांची फवारणी केली जात आहे. यामुळे केवळ वेळेचीच नव्हे, तर औषधे, मजूर आणि पैशांची मोठी बचत होत आहे.

​(निसर्गाची अवकृपा अन् दराची अनिश्चितता)

‘एल निनो’ची धास्ती संपली तरी बाजारातील दरांचा चढउतार आणि शेतमालाला योग्य भाव न मिळण्याची अनिश्चितता शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही. यातच रोगांच्या प्रादुर्भावाने पिकांचे होणारे नुकसान शेती परवडणारी उरू देत नाही. या दुहेरी संकटात पिके वाचवणे हे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान असते. आणि अशावेळी ड्रोन संकटमोहक ठरतो आहे.

​(ड्रोन फवारणीचे बहुविध फायदे)

पारंपरिक पंपाच्या तुलनेत ड्रोनमुळे कमी वेळेत जास्त क्षेत्रावर फवारणी होते. शेतात न उतरल्याने जमिनीचा तुडवा थांबतो व पिकांचे नुकसान टळते. हवेच्या दाबाने औषध पानापानांवर योग्य प्रमाणात पोहोचून औषध वाया जात नाही. यामुळे मजुरी आणि औषधांच्या खर्चात मोठी काटकसर होते.

(‘ड्रोन तंत्रज्ञान फायदेशीर’)

पावसाची उघडीप आणि अचानक पडणारे ऊन भात पिकासाठी घातक ठरत आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ड्रोनद्वारे फवारणी अत्यंत जलद व प्रभावीपणे होत असून हा प्रयोग सर्व बाजूने शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरत आहे, अशी प्रतिक्रिया भात उत्पादक शेतकरी कृष्णत दिनकर चव्हाण यांनी दिली.