कराड : तासवडे (ता. कराड) येथील एमआयडीसी परिसरातील एका केमिकल कंपनीत सोमवारी सकाळी भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले. उंचच उंच ज्वाळांनी कंपनीच्या संपूर्ण परिसराला वेढा घातला. या घटनेने एमआयडीसी परिसरात एकच धावपळ होताना, कराड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहिती अशी की, सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास तासवडे एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत भीषण आग लागली. या कंपनीतील ज्वलनशील रसायनामुळे (केमिकल्स) आग झपाट्याने पसरून भडकत राहिली. काही वेळातच रसायनाचे बॅरल्स तापून फुटल्याने स्फोट झाल्यासारखे आवाज येत होते. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी आजूबाजूचा परिसर तातडीने रिकामा करून, जलदगतीने सुरक्षितता उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली आणि या घटनेत काही मनुष्यहानी झाली का, किती आर्थिक नुकसान झाले, याचा अधिकृत तपास सुरू आहे. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असून, पोलीस व यंत्रणेचे या दुर्घटनेच्या एकंदरच परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
