कराड : अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याची राजधानी सॅक्रोमेंटो शहरात १४ महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातानंतर तेथील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नीलम तानाजी शिंदे या ३५ वर्षीय युवतीची मृत्यूशी झुंज अखेर संपली. मात्र, तिने अवयवदानातून मानवतेची लढाई जिंकत आपली आठवण मागे सोडली आहे. नीलमच्या मागे वडील, भाऊ असा छोटा परिवार आहे.
कराड तालुक्यातील वडगाव उंब्रजची सुकन्या नीलम शिंदे या ३५ वर्षीय युवतीची हृदयस्पर्शी कहाणी मन हेलावून टाकणारी आहे. नीलम ही अनेक वर्षांपासून अमेरिकेत नोकरी करत संगणकीय शास्त्राच्या ‘एमएस’ या उच्च पदवीचे शिक्षण घेत होती. सुरुवातील ‘नासा’ या अवकाश संशोधन संस्थेत ती कार्यरत होती. गेल्या सव्वादोन वर्षांपूर्वी तिच्या आईचे निधन झाल्याने नीलम गावी आली होती. आणि नंतर तिने पुन्हा अमेरिकेला जावून अन्य ठिकाणी नोकरी करत आपले शिक्षण सुरु ठेवले.
दरम्यान, १४ फेब्रुवारी २०२५ रोजी मोर्निग वॉकवेळी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने डोक्यासह अन्यत्र गंभीर इजा होवून ती बेशुध्दावस्थेत सॅक्रोमेंटो शहरात अत्याधुनिक रुग्णालयात उपचार घेत होती. या उपचारात तिचा मेंदू पूर्णपणे कार्यरत होऊ शकला नाही. आणि दीर्घकाळ बेशुध्दावस्थेतील नीलमचा २८ मार्चला उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ही वार्ता समजताच तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. नातवाईक व ग्रामस्थ शोकमग्न झाले.
मात्र, युध्दाच्या परिस्थतीमुळे तिचे वडील तानाजी शिंदे अथवा कोणासही तिच्या अंत्यसंस्कारासाठी अमेरिकेला जाता आले नाही, हे आणखी दुर्दैवी ठरले.
नीलमने जिवंतपणी अवयवदानाचा निर्णय घेतला होता. तिच्या कुटुंबीयांनी तिची ही शेवटची इच्छा पूर्ण करत, तिचे अवयवदान केले. अवयवदानाच्या प्रक्रियेस आठवड्याभराचा कालावधी लागला. ‘करोडो भारतीयांचे आशीर्वाद तिच्यासोबत होते, पण नियतीपुढे सर्व हतबल ठरले,’ अशी भावना तिचे मामा संजय कदम यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
अमेरिकेत हिंदू परंपरेनुसार तिच्यावर होणाऱ्या अंत्यसंस्काराची जबाबदारी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलेली नीलमची आत्या जयश्री शिंदे पार पाडतील.
आशा निमाली
‘सॅक्रोमेंटो’मधील १४ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या अपघातामुळे नीलम बेशुध्दावस्थेत उपचार घेत असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यावेळी तिच्याकडे जाण्यासाठी तिचे कुटुंब आतुरलेले असताना, तिच्या वडिलांना तातडीने अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा (प्रवेशाज्ञा) मिळण्यात मोठ्या अडचणी आल्या. यावर नीलमचा दुर्दैवी अपघात, तिच्या प्रकृतीची माहिती देतानाच वृत्तपत्रे व अन्य माध्यमांनी तिच्या कुटुंबियांना व्हिसा मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रयत्न करावा म्हणून आवाज उठवला, पाठपुरावा केला. यावर केंद्र व राज्य सरकारने आवश्यक मदतही केली.
आज नीलमच्या बरे होयाची आशा निमाल्याच्या वृत्ताने सारेच सुन्न झाले. तिच्या वडिलांची अवस्था तर, अत्यंत हळवी करणारी होती. ‘मुलीच्या जीवासाठी आम्ही प्रत्येक दरवाजा ठोठावला, पण तिच्यापर्यंत पोहोचू शकलो नसल्याची वेदना त्यांनी व्यक्त केली.
अवयवदानातून ती जिवंतच !
नीलमचे मामा संजय कदम म्हणाले, नीलमच्या फुफ्फुसात संसर्गामुळे ती २८ मार्चला निधन पावल्याचे उपचारकर्त्या डॉक्टरांनी सांगितले. मात्र, युद्धस्थितीमुळे अमेरिकेत असलेल्या नातेवाईकांनीच अंत्यविधीची तयारी केली. नीलमने अवयवदानाचा निर्णय घेतला होता, तो आम्ही पूर्ण केला. तिच्या जाण्याचे दुःख मोठे आहे, पण तिच्या अवयवांमुळे इतरांना जीवदान मिळेल, त्यातून नीलम जिवंतच असल्याचे समाधान आहे अशी भावना संजय कदम यांनी व्यक्त केली.
