कोल्हापूर : बेळगावसह सीमाभागामध्ये १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळा दिन कार्यक्रमाची तयारी आज शनिवारी मराठी भाषकांनी सुरू केली असताना त्यामध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर रोखले आहे. यामुळे संतप्त शिवसैनिकांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले असून यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

भाषावार प्रांतरचना होऊन कर्नाटक राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ साली  झाली. याच्या विरोधात बेळगावसह सीमाभागात याही वर्षी मराठी बांधव आपापले व्यवहार बंद ठेवून शनिवारी काळा दिन पाळून केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन करीत आहेत. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, शहर महाराष्ट्र एकीकरण समिती, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, म.ए. समिती महिला आघाडी, बेळगाव शिवसेना सीमाभाग, मराठी युवा मंच युवा आघाडी आदी संघटनांकडून यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान या काळा दिन कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जाणाऱ्या कोल्हापुरातील लोकांना रोखण्याची पावले कर्नाटक सरकारने टाकली आहेत.

महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांना बंदी घालण्यात आलेली आहे. शिवसेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, सुनील शिंत्रे, सुनील मोदी या नेत्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. तरीही संजय पवार, विजय देवणे, सुनील शिंत्रे आज महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर पोहचले. येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. बेळगाव हद्दीत येणाऱ्या प्रत्येक वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत आहे.

मराठी माणसांना अडवले

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काळा दिन कार्यक्रमाला दडपण्याचा प्रयत्न बेळगावमध्ये कर्नाटक पोलिसांकडून होत आहे. बेळगावच्या सीमेवर मराठी माणसांना अडवण्यात आले आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. बेळगाव सीमेवर तणाव होता. कर्नाटक पोलिसांनी कितीही दडपशाही केली तरी कोणत्याही परिस्थितीत आम्ही बेळगावमध्ये जाणार, असा पवित्र शिवसेना उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांनी घेतला आहे.

काळा दिन कशासाठी?

भाषावार प्रांतरचना होऊन कर्नाटक राज्याच्या स्थापना १ नोव्हेंबर १९५६ साली  झाली. तेव्हा महाराष्ट्रात समाविष्ट होण्याच्या मराठी भाषकांच्या मागणी नाकारून बेळगावसह साडेआठशेवर गावे कर्नाटक राज्यात घुसडण्यात आली. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आल्याच्या निषेधार्थ दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी सीमाभागात काळा दिन पाळला जातो. गेली ६९ वर्षांपासून मराठी भाषक हजारोंच्या संख्येने काळया दिनाच्या मूक मोर्चात सहभागी होऊन मराठी आस्मिता दाखवत आले आहेत.  याही वर्षी मराठी बांधव आपापले व्यवहार बंद ठेवून शनिवारी काळा दिन पाळत आहेत.