कोल्हापूर : माहिती मिळत नसल्याच्या रागातून गर्जना संघटनेच्या कार्यकर्त्या दीपाली खारगे आणि करवीर पंचायत समिती कार्यालयातील कर्मचा-यांमध्ये सोमवारी जोरदार वाद झाला. खारगे यांनी कर्मचा-यांची गळपट पकडून धक्काबुक्की केली. याच्या निषेधार्थ संतप्त कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन करून कार्यालयाबाहेर ठिय्या मारला. या घटनेने पंचायत समिती कार्यालयात तणावाची स्थिती बनली असली तरी दोन्हीकडून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली नाही.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, महिला बचत गटांसाठी काम करणा-या उचगावच्या संगीता कुंभार, गर्जना संघटनेच्या कोरोची (ता. हातकणंगले) येथील दीपाली खारगे, प्रवीण भालेराव हे पंचायत समिती कार्यालया पोहोचले. या सर्वजण गोकुळ दूध संघाच्या गैरव्यवहारा विरोधात लढा देत असलेले गर्जना संघटनेचे प्रकाश बेलवाडे यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येते.
त्यांनी महिला बचत गट व पाणी स्वच्छता विभागात जाऊन कर्मचा-यांशी वाद घातला. अधिकारी जागेवर नाहीत. हालचाल रजिस्टर दाखवा. ओळखपत्र दाखवा, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडे केली. त्यावेळी कर्मचारी अनुप पाटील यांनी वरिष्ठ अधिकारी येताच महिती देऊ शकतील, असे सांगितले. त्यावर खारगे यांनी पाटील यांच्याशी वाद घातला. त्यांची गळपट पकडून धक्काबुक्की केली. वाद सोडविण्यासाठी गेलेल्या कर्मचा-यांनाही शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.
लक्ष्मीपुरी पोलिसांनी पंचायत समिती कार्यालयात धाव घेतली. त्यांनी खारगे, अनुप पाटील यांना पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. दरम्यान, धक्काबुक्कीच्या निषेधार्थ कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन करून कार्यालयाबाहेर ठिय्या मारला. गटविकास अधिकारी संदीप भंडारे, सहायक गटविकास अधिकारी सुहास पाटील यांनी बैठक घेऊन चर्चा केल्यानंतर कर्मचा-यांनी पुन्हा काम सुरू केले.
वादग्रस्त कारभार
कोल्हापूरमधील करवीर पंचायत समिती आपल्या वादग्रस्त आणि ढिसाळ कारभारामुळे चर्चेत आली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता, २५ कोटींचा पतसंस्था अपहार, आणि माहिती अधिकार कार्यकर्ते व अधिकारी यांच्यातील राड्यामुळे प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. करवीर पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेमध्ये तत्कालीन संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्रे वापरून २४ कोटी ६९ लाखांहून अधिक रकमेचा अपहार केल्याचे प्रकरण गाजत आहे. याप्रकरणी ३४ हून अधिक जणांवर गुन्हे दाखल असून, संशयितांच्या घरांची झडती घेण्यात आली होती. तालुक्यात १०० ग्रामसेवक कार्यरत असताना, सभागृहात केवळ ४० खुर्च्या असल्याने अनेक ग्रामसेवकांना लिखाणाच्या टेबलवर बसून बैठक करावी लागते. यामुळे कार्यालयीन नियोजनाचा अभाव चव्हाट्यावर आला आहे. या प्रकारांमुळे करवीर तालुक्याचा विकासकामांचा वेग मंदावला असून, प्रशासकीय शिस्त पूर्णपणे बिघडल्याची टीका होत आहे.
