सांगली : दसर्‍यावेळी शोभेच्या दारूची आताषबाजी करण्यासाठी प्रसिध्द असलेल्या कवठेएकंद (ता. तासगाव) येथे वस्तीवरील शेडमध्ये भीषण स्फोट होउन झालेल्या दुर्घटनेत दोन तरूण जखमी झाले आहेत. जखमीवर सांगलीतील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

कवठेएकंद (ता. तासगाव) येथे गाव तलावाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत दोघे जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटाचा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली असून, काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दसरा उत्सवाच्या पार्डभूमीवर शोभेची दारू तयार करण्यासाठी किंवा तयार दारू साठवून ठेवण्यात आलेल्या ठिकाणी हा स्फोट झाल्याचे प्राथमिक स्वरूपात सांगण्यात येत आहे. मात्र, शोभेच्या दारूचा साठा नेमका किती होता, तो तेथे कशासाठी ठेवण्यात आला होता आणि संबंधितांकडे आवश्यक परवानगी होती का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

स्फोटाची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उप अधिक्षक किरण अवचर आणि निरीक्षक टकले यांनी घटनास्थळी धाव घेउन पाहणी केली. दरम्यान, याबाबत पोलीस निरीक्षक श्री. टकले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, घटनास्थळी चौकशी केली असता वस्तीवरील शेडमध्ये पंप, द्राक्षबागेवर मारण्याची औषधे ठेवण्यात आली होती असे सांगण्यात आले.तर वीजेचे शार्ट सर्किट होउन हा स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबाबत पोलीस ठाण्यात जखमी झालेल्या तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्यात येणार आहे. यानंतर नेमकी परिस्थिती समोर येईल असेही त्यांनी सांगितले.