सांगली : कृषीपंपाच्या केबल चोरीप्रकरणी पोलीसांच्या ताब्यात असलेल्या संशयित आरोपींना ताब्यात द्यावे यासाठी नातेवाईकांनी पोलीसावर दगडफेक करीत धिंगाणा घालण्याचा प्रकार कवठेमहांकाळमध्ये घडला. हुल्लडबाजांना  पिटाळून लावण्यासाठी पोलीसांनी बळाचा वापर करून सात जणाविरूध्द गुन्हाही दाखल केला आहे.याबाबत माहिती अशी, कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विठुरायाचीवाडी आणि अग्रण धुळगाव येथील शेतकर्‍यांची केबल चोरीला गेल्याप्रकरणी पोलिसांनी सावळी (ता. मिरज) येथील चौघांना अटक केली होती. मात्र, या संशयित आरोपींना पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देत असताना, आरोपींच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोरच जोरदार धिंगाणा घातला. पोलिसांवर दगडफेक आणि शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गोंधळानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नातेवाईकांवर सौम्य लाठीमार केला.

विठुरायाची वाडी व अग्रण धुळगाव (ता.कवठेमहांकाळ) येथील तब्बल २७ शेतकर्‍यांनी दि. २३ मे रोजी केबल चोरीला गेल्याबाबत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा सखोल तपास करत असताना पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे राजकुमार श्याम गोसावी, राहुल श्याम गोसावी, प्रवीण तानाजी गोसावी आणि अरविंद तानाजी गोसावी (सर्व रा. सावळी, ता. मिरज) या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील १ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही केबल चोर्‍या केल्याची कबुली दिली. त्यामुळे पुढील तपासासाठी आटपाडी पोलीस या आरोपींचा ताबा घेण्यासाठी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात आले होते.  आरोपींना आटपाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, गोसावी यांचे नातेवाईक पोलीस ठाण्यासमोर गोळा झाले. आरोपींचा जामीन झाला आहे, त्यांना आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी त्यांनी लावून धरली. मात्र, पोलिसांनी कायद्यानुसार त्यास नकार देताच नातेवाईक संतप्त झाले आणि त्यांनी पोलीस ठाण्यासमोर धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु नातेवाईक थेट पोलिसांच्या अंगावर धावून आले, शिवीगाळ केली आणि दगडफेक सुरू केली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत धिंगाणा घालणार्‍यांवर सौम्य लाठीमार केला.

  आरोपींना घेऊन जाण्यास अटकाव करणे आणि पोलिसांशी झोंबाझोबी करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी तानाजी अण्णाप्पा गोसावी, यशवंत मारुती गोसावी, सरस्वती प्रवीण गोसावी,ललिता शाम गोसावी, श्याम नाना गोसावी, उमेश अण्णाप्पा गोसावी आणि हारुबाई गोसावी या सातजणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे यांनी सांगितले.