कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाबाबत कोल्हापुरातील रंगकर्मींच्या बहुतांशी मागण्या कोल्हापूर महापालिकेने मान्य केल्या आहेत. याबाबत आज महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याशी झालेल्या चर्चेत रंगकर्मींचे मुद्दे मान्य केल्यामुळे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह बचाव आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती सुनील घोरपडे, किरणसिंह चव्हाण, प्रसाद जमदग्नी, आनंद काळे, रोहन घोरपडे यांनी दिली.
केशवराव भोसले नाट्यगृहाचे खाजगीकरण करण्याच्या मुद्द्यावरून रंगकर्मींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी या प्रश्नावर धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर महापालिकेत झालेल्या बैठकीवेळी महापौर रूपाराणी निकम यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या मुद्द्यावरून रंगकर्मींनी नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला होता. नाट्यगृहाचे खासगीकरण केले जात नसून केवळ व्यवस्थापनात सुसूत्रता आणत असल्याचे महापौर रूपाराणी निकम व आयुक्त राजेंद्र भारुड यांनी सांगितले होते. त्याचा इन्कार रंगकर्मींनी केला होता. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा तसेच त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे कोल्हापुरात अस्वस्थता पसरलेली होती. रंगकर्मींनी महापालिका प्रशासनावर आणि महापौरांवर नाट्यगृह ठेकेदाराच्या घशात घालण्याचा गंभीर आरोप केला आहे, तर रंगकर्मींनी नाट्यगृहाचे जास्त भाडे आकारून पैसे कमावल्याचे महापौर व प्रशासनाने म्हटले होते.
आयुक्तांचे रंगकर्मींना पत्र
याबाबत आज महापालिकेचे आयुक्त डॉ. भारुड यांच्याशी रंगकर्मींची चर्चा झाली. यावेळी महापालिकेने रंगकर्मींच्या बहुतांशी मान्य मान्य केल्या. नाट्यगृहाचे खाजगीकरण होणार नाही. संपूर्ण मालकी महापालिकेची राहील असे स्पष्ट करण्यात आले. नाट्यगृहाचे देखभाली संदर्भातील हाउसकीपिंगचे सेवा, दुरुस्ती एका बाह्य यंत्रणेमार्फत निविदा प्रक्रिया राबवून केले जाणार आहे. नाट्यगृहाचे तिकिटाचे बुकिंग पारदर्शकपणे ऑनलाईन पद्धतीने महापालिकेमार्फतच केले जाणार आहे. नाट्यगृहांमध्ये आयोजित कार्यक्रमांचे दर व निविदेचा मसुदा याबाबत महापालिका प्रशासन महापौर व इतर पदाधिकारी यांच्या समवेत ९ ऑगस्ट नंतर चर्चा करून निश्चित करणार आहे. त्यामुळे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बाबत आंदोलन मागे घ्यावे, असे पत्र आयुक्त भारुड यांनी समस्त रंगकर्मी यांच्या नावाने दिले होते.
तूर्तास वादावर पडदा
बहुतेक मागण्या महापालिकेने मान्य केल्या आहेत. हा रंगकर्म्मींच्या रएकीचा विजय आहे. त्यामुळे आतापासून आंदोलन स्थगित करीत असल्याचे रंगकर्मींनी एका पत्रकामध्ये म्हटले आहे. यामुळे तूर्तास केशवराव भोसले नाट्यगृहातील महापालिका आणि रंगकर्मी यांच्यातील वाद मिटल्याचे स्पष्ट झाले आहे.
