कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खासगीकरणाची चर्चा चुकीची असून ती कुठून सुरू झाली हे माहीत नाही. हे नाट्यगृह कोणत्याही परिस्थितीत खासगी व्यक्ती वा संस्थेला चालवण्यास दिले जाणार नाही. त्याचे व्यवस्थापन पूर्वीप्रमाणेच महानगरपालिकाच पाहणार असल्याचे विधान खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी सकाळी कोल्हापुरात केले. तर महाडिक यांच्या नेतृत्वाखालील कोल्हापूर महापालिकेतील भाजपाच्या पदाधिकारी व नगरसेवकांच्या एका गटाने सायंकाळी एका पत्रकाद्वारे त्यांच्या विरोधात भूमिका घेतली.
‘ महासभेच्या निर्णयाला विरोध करणारे काही जण म्हणजे कोल्हापूर नव्हे,’ अशी टीका या नगरसेवकांनी रंगकर्मींवर केली आहे. रंगकर्मी हे खाजगीकरणाच्या विरोधात आहेत. तर नगरसेवकांनी पुन्हा एकदा खाजगीकरणाचे समर्थन करतानाच महाडिक यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने कोल्हापूर महापालिकेतील महायुतीतील सावळा गोंधळ समोर आला आहे.
भाजपाच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी पत्रकात म्हटले आहे की,शहरातील सर्व नागरिकांनी निवडून दिलेल्या ८१ नगरसेवकांनी, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाबाबत घेतलेल्या निर्णयाला विरोध करणारे काही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोक म्हणजे समस्त कोल्हापूरकर नव्हेत. सांगोपांग चर्चा आणि संपूर्ण विचारांती महानगरपालिकेचे हित लक्षात घेऊन केलेल्या या निर्णयास कोणी स्वार्थासाठी विरोध करत असेल तर ते योग्य नाही.
दोन वर्षापूर्वीच्या संशयास्पद आगीत लोकराजा रा. छ. शाहू महाराजांचे हे पॅलेस थिएटर भस्मसात झाल्यानंतर महायुती सरकारने तातडीने निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर या नाट्यगृहाची वास्तू आता नवीन अत्याधुनिक सुविधांसह रसिक सेवा करण्यासाठी सज्ज झालेली आहे. आगामी काही दिवसात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नूतनीकरण केलेल्या वास्तूचे लोकार्पण होणार आहे. याला खोडा घालण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत.
या सभागृहाचा वार्षिक स्थिर खर्च सुमारे एक कोटी रुपये आहे. सभागृहाच्या व्यवस्थापनासाठी किमान २५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. यातील ध्वनी यंत्रणा कार्यरत करण्यासाठी आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी तज्ञ अभियंत्यांची आवश्यकता आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सध्याच्या आर्थिक आणि कर्मचाऱ्यांच्या सांख्यिक परिस्थितीनुसार स्वबळावर नाट्यगृहाचे व्यवस्थापन जवळपास असंभव आहे. त्याकरिता यातील काही सेवांचे बाह्य संस्थांकडून कामकाज चालवणे अपरिहार्य आहे. नाट्यगृहाचे व्यवस्थापक महानगरपालिकेचे अधिकारीच असणार असून केवळ काही सेवा बाह्य संस्थांकडून करून घेण्यात येणार आहे.
याबाबत काही रंगकर्मी आणि कार्यक्रमांचे ठेकेदार जास्त असलेल्या लोकांनी विरोध दर्शवला आहे आणि ते कोल्हापूरकरांची दिशाभूल करीत आहेत. वास्तविक त्यांच्यासोबत महापौर व आयुक्तांनी अनेक वेळा चर्चा करून, त्यांनी सुचविल्याप्रमाणे प्रमाणे अनेक सूचनांचा समावेश अंतिम निर्णयात करण्यात आलेला आहे. कार्यक्रमासाठी वेळ राखून ठेवताना कार्यक्रमाचे स्वरूप, कार्यक्रम घेणाऱ्या संस्थेचे नाव इत्यादि माहिती आवश्यक केल्यामुळे आणि त्याच्यापेक्षा वेगळा कार्यक्रम करू न देण्याची भूमिका आल्यामुळे कार्यक्रमांच्या वेळेचा काळाबाजार करणाऱ्या काही ठेकेदारांना आगामी कालावधीत कार्यक्रमाच्या वेळा राखून ठेवण्यात अडचण निर्माण होणार आहे आणि म्हणूनच त्यांनी काही रंगकर्मींना हाताशी धरून या प्रस्तावाला विरोध सुरू केला आहे.
वास्तविक पाहता कोल्हापूर शहरातील समस्त नागरिकांनी लोकशाही मार्गाने निवडून दिलेल्या ८१ नगरसेवकांना महासभेमध्ये सांगोपांग चर्चा करून आणि संपूर्ण विचारांती महानगरपालिकेचे हित लक्षात घेऊन घेतलेल्या निर्णयाला विरोध करणे म्हणजे एका अर्थाने कोल्हापूरच्या जनतेचा अपमान आहे. रंगकर्मींनी महानगरपालिकेची भूमिका समजावून घेऊन त्यांना पुढे करून स्वार्थी हेतूने नाट्यगृहाच्या व्यावसायिक व्यवस्थापनाला विरोध करू नये असे आमचे आवाहन आहे. त्यातूनही त्यांनी विरोध केला तर तो त्यांचा लोकशाहीतील अधिकार आहे.
मुख्यमंत्र्यावरून जशास तसे उत्तर
परंतु नाट्यगृहाच्या लोकार्पणास येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काही अपकृत्य करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशाराही आम्ही देत आहोत,असे या पत्रकात म्हटले आहे. हे पत्रक क्रीडा समिती सभापती विजयसिंह खाडे पाटील, आरोग्य समिती सभापती सुरेखा ओटवकर, महिला व बालकल्याण समिती उपसभापती दीपा ठाणेकर, स्थायी समिती सदस्या डॉ. नेहा तेंडुलकर , रेखा उगवे, पल्लवी देसाई, निलांबरी साळोखे, दीपा काटकर, अर्चना कोराणे , माधवी पाटील, राजनंदा महाडिक, पूर्व राणे, प्रमोद देसाई , अभिजित मोकाशी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
