सातारा: पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात अचानक मालवाहू ट्रक बंद पडल्याने साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रक्षाबंधन तसेच शनिवार आणि रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर आधीच वाहनांची प्रचंड गर्दी असताना, या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांसह वाहनचालकांचे मोठे हाल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गावी जाणारे चाकरमानी, रक्षाबंधनासाठी निघालेल्या भगिनी आणि पर्यटनासाठी बाहेर पडलेले पुणे-मुंबईकर यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यातच सायंकाळच्या सुमारास घाट रस्त्यावर अवजड वाहनांची संख्या अचानक वाढली. घाटातील तीव्र चढावर काही वाहने गरम होऊन बंद पडली, तर एक मुख्य मालट्रॅक रस्त्याच्या मधेच बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.
वाहनांची संख्या जास्त असतानाच, काही वाहनचालकांनी घाईगडबडीत पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने कोंडीत अधिकच भर पडली. सध्या साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहने अत्यंत संथ गतीने सरकत आहेत.
घटनास्थळी महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासन दाखल झाले असून, बंद पडलेला ट्रक हटवून वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तरी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी शिस्त पाळावी आणि संयम ठेवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
