सूत्रधाराचा शोध सुरूच ल्लसात दिवसांची पोलीस कोठडी
ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोिवदराव पानसरे यांच्या खुनाला सात महिने पूर्ण होत असताना बुधवारी पोलिसांनी सांगलीतून समीर विष्णू गायकवाड या तरुणाला अटक केली. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तो सनातन संस्थेचा पूर्ण वेळ कार्यकर्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पानसरे खून प्रकरणातील तो संशयित आहे, त्यानेच खून केला असल्याचे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचेही तपास यंत्रणेने सांगितले.
१५ फेब्रुवारी रोजी सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेलेले गोिवद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे या उभयतांवर दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. पाच दिवसांच्या उपचारानंतर गंभीर जखमी झालेले पानसरे यांचा मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तेव्हापासून पोलीस पानसरे यांच्या खुन्याचा तपास करीत होते. त्यासाठी वेगवेगळी पथके तनात केली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर व पानसरे यांच्या खुन्यांचा तपास घेण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याने टीकेची झोड उठली होती. याची दखल घेऊन राज्य सरकारने कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय कुमार यांची नियुक्ती केली होती.
तपासादरम्यान पोलिसांचा सांगलीतील समीर गायकवाड या तरुणावरील संशय बळावला होता. पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांपासून त्याच्या हालचाली, संपर्क यावर बारीक नजर ठेवली होती. माहितीची खात्री झाल्यानंतर मंगळवारी रात्री समीरच्या सांगलीतील घरावर छापा टाकला. पहाटे चार वाजता त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, पण न्यायालयाने ७ दिवस म्हणजे २३ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

संशयित म्हणून अटक
गायकवाड याला पानसरे खून प्रकरणात संशयित म्हणून अटक केली आहे. तो हल्लेखोर असल्याचे स्पष्ट झालेले नाही. १९९८ पासून तो सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. त्याची पत्नी सनातनचे मुख्यालय असलेल्या रामनाथी आश्रमामध्ये सेवेत आहे. गायकवाड परिवार सनातनच्या संबंधातला आहे. पानसरे यांचा खून होण्यापूर्वी दोन दिवस अगोदर तो सांगलीमध्ये आला होता. तेव्हापासूनच्या त्याच्या सर्व हालचालींचा मागोवा घेतला आहे. यापुढे गायकवाडकडून पानसरे हत्येबाबतचे तपशील मिळवले जाणार असून त्याचा तसेच अन्य कोणी सूत्रधार आहे का, हे तपासले जाणार आहे. गायकवाडला अटक करण्यामागे नेमका कोणता धागा होता, हे मात्र त्यांनी वारंवार विचारणा करूनही सांगण्याचे टाळले.
सनातन संस्थेचा पोलिसांवर आरोप
समीर गायकवाड हा निरपराध असून, सनातन द्वेष्टय़ांच्या दबावाला बळी पडून पोलिसांनी हा बनाव केला असल्याचे पत्रक सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त वीरेंद्र मराठे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. यापूर्वीही नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी ‘सनातन’च्या अनेक साधकांची अशीच चौकशी करण्यात आली होती, याकडेही पत्रकात लक्ष वेधले आहे.