कोल्हापूर : चालू गळीत हंगामात उसाला प्रतिटन ४५०० रुपये पहिली उचल आणि ५००० रुपये अंतिम दर मिळावा या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २० दिवसापूर्वी पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्रातील शेवटच्या कोगनोळी टोल नाक्याजवळ आंदोलन केले होते. तर आज कोल्हापूरच्या प्रवेशद्वार असलेल्या किणी येथे राष्ट्रीय महामार्ग आंदोलन सुरू केले. आज दिवसभर भर उन्हात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले असले तरी शासनाच्या वतीने कोणीही चर्चेला आले नसल्याने आंदोलन सुरूच राहिले. आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ऐन दिवाळीत विस्कळीत झाल्याने प्रवासी, वाहनधारकांना फटका बसला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २५ व्या ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे साखरेचा किमान विक्री हमी भाव प्रतिकिलो ५० रुपये करावा, सी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा आणि लवकर गळीत हंगाम सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदानसह प्रतिटन ५ हजार रुपये दर मिळावा या तीन प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
केंद्र सरकारसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. या आंदोलनानंतर बरोबर वीस दिवसानंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग आंदोलन सुरू झाले असले तरी आता या आंदोलनाची दिशा कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात असलेल्या हातकणंगले तालुक्यातील किनी टोल नाका येथे सुरू झाली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्यावर तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनामुळे पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल आठ तासांहून अधिक काळ पूर्णपणे ठप्प झाला होता. प्रशासन किंवा साखर कारखानदारांकडून कोणतीही चर्चा करण्यासाठी पुढाकार न आल्याने आंदोलक शेतकरी अधिकच आक्रमक झाले होते. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता.
या आंदोलनाची मुख्य मागणी म्हणजे चालू हंगामासाठी उसाची पहिली उचल प्रतिटन ४५०० रुपये देण्यात यावी ही आहे. साखरेला चांगला दर असतानाही कारखानदार शेतकऱ्यांना लुबाडत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
जमावबंदी आदेशाकडे दुर्लक्ष
मंगळवारी सकाळपासूनच हजारो शेतकरी महामार्गावर उतरल्याने पुणे-कोल्हापूर मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. प्रशासनाने जमावबंदी आदेशाची नोटीस बजावूनही शेतकऱ्यांनी ती नोटीस झुगारून देत दिवसभर रस्त्यावरच ठाण मांडले होते.
भर रस्त्यावर भोजन
या आंदोलनादरम्यान किणी, घुणकी, भादोले परिसरातील गावकऱ्यांनी मोठी माणुसकी दाखवत आंदोलक शेतकऱ्यांसाठी चहा, केळी, दुपारच्या जेवणासाठी भात-आमटी आणि घरोघरांमधून भाकरी-चपातीची सोय केली होती, त्यामुळे आंदोलकांचा उत्साह अधिकच वाढला होता.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता, यामध्ये ३ डीवायएसपी, ७ पोलीस निरीक्षक, १५ उपनिरीक्षक, ४०० पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव दलाच्या २ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.
पर्यायी मार्गाने वाहतूक
तर दुसरीकडे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने वाहतूक पेठ नाका, आष्टा, सांगली फाटा, शिये फाटा या पर्यायी मार्गांवर वळवली होती. या आंदोलनात राजू शेट्टी, राजेंद्र गड्ड्याण्णावर, विठ्ठल मोरे, धनाजी पाटील, सचिन शिंदे, सुधीर मगदूम, अण्णा मगदूम यांच्यासह हजारो शेतकरी सहभागी झाले होते.
रात्रीही आंदोलन सुरू
उसाला योग्य भाव मिळेपर्यंत आणि प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला असून रात्री उशिरापर्यंत टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन सुरूच होते.
