सांगली : भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला भेट देऊन जन्म-मृत्यू नोंदणी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीनंतर महापालिकेच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून, विरोधी पक्षाने सोमय्या यांच्या बैठकीच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महापौर धीरज सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील तसेच संबंधित विभागातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जन्म-मृत्यू नोंदणी विभागाच्या कामकाजाची माहिती सोमय्या यांनी घेतल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी या बैठकीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. “महापालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचा किरीट सोमय्या यांना नेमका कोणता अधिकृत अधिकार आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची सविस्तर माहिती मागविण्यात येणार असून, आगामी महासभेत हा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाकडून खुलासा मागणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या बैठकीमुळे महापालिकेतील प्रशासनिक कामकाजात राजकीय हस्तक्षेप झाला का, यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची चिन्हे आहेत. आगामी महासभेत या विषयावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
