scorecardresearch

किरीट सोमय्या गुरुवारी कोल्हापूर जिल्हा बँकेत; अध्यक्ष हसन मुश्रीफांची स्वागताची भूमिका

सोमय्या उद्या सहकार सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, शेतकरी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर सोमय्या माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

Kirit Somaiya Kolhapur District Bank
किरीट सोमय्या (संग्रहित छायाचित्र)

कोल्हापूर : भाजपा नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाणार आहेत. तर, मुश्रीफ यांनी संघर्ष न करता सोमय्या यांच्या स्वागताची भूमिका बुधवारी घेतल्याचे दिसून आले.

गेल्या काही दिवसांपासून सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला चुकीच्या पद्धतीने पैसे पुरवल्याचा, तसेच जिल्हा बँकेतून गडहिंग्लज कारखाना चालवण्यास घेतलेल्या ‘ब्रिक्स’ कंपनीला केलेला अर्थपुरवठाही वादग्रस्त असल्याचा आरोप केला आहे. त्यावर मुश्रीफ यांच्यासह त्यांचे नातेवाईक, त्यांचा घोरपडे कारखाना, जिल्हा बँकेवर ईडीने छापेमारी केली होती.

हेही वाचा – एकनाथ शिंदेंना कोल्हापुरात राजकीय पाठबळ; ठाकरे गट, राष्ट्रवादीला धक्का

अधिकारी, शेतकरी भेट

सोमय्या उद्या सहकार सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, शेतकरी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर सोमय्या माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

हेही वाचा – “संजय राऊतांच्या आरोपांकडे आम्ही मनोरंजन म्हणून बघतो”; उदय सामंतांची खोचक टीका; म्हणाले, “शिस्तभंगाची कारवाई…”

संघर्ष ऐवजी स्वागत

ईडीच्या कारवाईवेळी कागल येथे मुश्रीफ कार्यकर्त्यांनी तर जिल्हा बँकेत कर्मचाऱ्यांनी विरोध केला होता. तथापि, कोल्हापूर जिल्हा बँकेत किरीट सोमय्या यांचे स्वागत असल्याची प्रतिक्रिया आज बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. किरीट सोमय्या गुरुवारी कोल्हापूर जिल्हा बँकेच्या केंद्र कार्यालयाला भेट देणार असल्याचे समजले. बँकेमध्ये त्यांचे स्वागतच आहे. मी त्यांना बँकेत येवून जी माहिती हवी असेल ती घ्या, असे आवाहन यापूर्वीच केले होते. कदाचित; त्यानुसार ते येत असावेत. प्रशासकाची कारकीर्द संपल्यानंतर बँकेने गेल्या आठ वर्षांत प्रगती केलेली आहे. विविध पक्षांचे प्रतिनिधी असलेले संचालक मंडळ एकमताने, विश्वासाने काम करीत आहेत. ३१ डिसेंबर २०२२ अखेर बँकेला १०५ कोटी नफा झालेला आहे. कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-02-2023 at 22:08 IST