सोलापूर : “कविवर्य दत्ता हलसगीकर यांची कविता ही निखळ, नितळ आणि सात्त्विक मूल्यांची जपणूक करणारी होती. दुःखाची तक्रार न करता त्यांनी आपल्या लेखनातून कायम प्रेम, करुणा आणि माणुसकीचे पसायदान मागितले,” असे प्रतिपादन सोलापूर आकाशवाणीचे निवृत्त साहाय्यक संचालक सुनील शिनखेडे यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद (जुळे सोलापूर शाखा) आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ज्येष्ठ कवी ‘स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार’ यंदा प्रसिद्ध कवी-अभिनेते किशोर कदम (सौमित्र) यांना प्रदान करण्यात आला. येथील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा होत्या. रोख १० हजार रुपये, चांदीचे कमळ आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
शिनखेडे म्हणाले, “हलसगीकरांच्या कवितेने गरिबांचे चांदणे मांडले आणि आकाशवाणीच्या माध्यमातून ती २२ भाषांमध्ये पोहोचून मराठीला असामान्य उंची मिळवून दिली. दुसरीकडे, कवी सौमित्र यांच्या कवितांमधून मानवी जगण्यातील खरा संघर्ष आणि पावसाचे विविध रंग प्रभावीपणे उमटतात.”
पुरस्काराला उत्तर देताना किशोर कदम म्हणाले, “माझी कविता सर्वसामान्यांच्या जगण्याशी नाळ जोडणारी आहे. हलसगीकरांसारख्या ऋषितुल्य कवीच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही माझ्या काव्यप्रवासाला मिळालेली मोठी दाद आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘मसाप’ जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी केले, तर मानपत्राचे वाचन कार्याध्यक्ष सायली जोशी यांनी केले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अश्विनी वाघमोडे यांनी केले, तर आभार यशवंत बिराजदार यांनी मानले. या सोहळ्यास साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सासुरवाडीचा सन्मान अधिक मोलाचा….
“सोलापूर हे माझी सासुरवाडी असल्याने या भूमीत मिळालेल्या पुरस्काराचा आनंद शब्दातीत आहे,” अशा शब्दांत कवी सौमित्र यांनी सोलापूरकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “अनेक पुरस्कार मिळाले तरी सासुरवाडीतील माणसांच्या उपस्थितीत झालेला हा गौरव माझ्यासाठी अत्यंत विशेष आहे,” असे सांगत त्यांनी आपल्या काही लोकप्रिय कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.
