कोल्हापूर : कोल्हापुरात १०० कोटींचे रस्ते प्रकल्प राबवला जात असला तरी या नव्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. याच्या निषेधार्थ शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या खड्ड्यात झाडे लावून उद्धव ठाकरे शिवसेनेने गुरुवारी अनोखे आंदोलन केले. करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीच्या साक्षीने हे आंदोलन महाद्वार रस्त्यावर करण्यात आले. पैसा झाला मोठा – रस्ता झाला खोटा अशी फलकबाजी करण्यात आली होती.
कोल्हापूर शहरात गेल्या वर्षभरात शेकडो कोटी निधी रस्त्यांसाठी आला. त्या संदर्भात स्थानिक नेत्यांनी बॅनरबाजी ही जोरदार केली. पण कोल्हापूर शहरात प्रत्येक चौका – चौकात रस्त्यांच्या अवस्था अतिशय खराब झाली आहे. या विरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बँक मध्ये नागरिकांच्या वतीने याची काही दाखल करण्यात आली आहे. अलीकडे पावसामुळे काही महिन्यापूर्वी केलेले रस्ते पूर्णपणे खराब होऊन निकृष्ट झाले आहेत. प्रत्येक चौका – चौकात मोठ -मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात, वाहनांचे नुकसान होत चालले आहे. तरी देखील लोकप्रतिनिधी, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
इतके कोटी रस्त्यावर खर्च केले असतील तर मग रस्ते खराब कसे झाले? ते कोणाच्या खिश्यात गेले?असा सवाल करत या खराब रस्त्यांच्या व पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात कोल्हापूर शिवसेना शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या रस्त्यांच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून अनोखे आंदोलन करण्यात आले.
यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात, टक्केवारी व भ्रष्टाचारा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे कुंभकर्णाचे प्रशासन आहे. झोपलेले प्रशासन लोकांचा जीव गेल्यावर हे जागे होणार का? असा सवाल यावेळी शिवसैनिकांनी केला. हे आंदोलन शिवसेना शहरप्रमुख मंजीत माने यांच्या नियोजनाखाली करण्यात आले. या आंदोलनात हटके बॅनरबाजी केली होती. हे आंदोलन कोल्हापूर शहरातील अंबाबाई मंदिर परिसरा जवळ बिनखांबी गणेश मंदिर ते मिरजकर तिकटी परिसरात खराब रस्त्याजवळ करण्यात आले. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था सुधारली नाही तर संबंधित स्थानिक नेत्यांना आणि ठेकेदारांना शिवसैनिक रस्त्यावर फिरूकू देणार नाहीत, असा इशारा देण्यात आला.
शिवसेना उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख विराज पाटील,आयोजक शिवसेना शहरप्रमुख मंजित माने,महिला उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत, दीपाली शिंदे, शौनक भिडे, रणजित आयरेकर, समरजीत जगदाळे, ऋषिकेश जोशी, पप्पू कोंडेकर, तृप्ती विभुते, रुपेश रोडे, किशोर दाभाडे, अरुण अब्दागिरे, कनिष्क शिंदे, चिन्मय बोकील, अक्षय मोरे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.
