संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन) कक्षामध्ये राहणाऱ्या तरुणाने तिथेच क्वारंटाइन असलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याला स्वतंत्र पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी तरुणीने आई-वडिलांसोबत सांगोला (जि. सोलापूर) ते इचलकरंजी (जि. कोल्हापूर) असा प्रवास केला आहे. आयजीएम हॉस्पिटल इचलकंरजी येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेवून ती इचलकरंजी येथील डीकेटीई गर्ल्स हायस्कूल येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल झाली.

आज सकाळी क्वारंटाइनमधील लोक आंघोळीला गेलेले असताना आरोपीने छप्पर नसलेल्या स्नानगृहाच्या भितींवर चढून संबंधित तरुणीकडे पाहून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. आरोपी तरुण याच इमारतीमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये राहतो. तरुणीने याबाबत फिर्याद दिली असून त्यानुसार तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी सांगितले.