कोल्हापूर : निवृत्त शल्य चिकित्सकाने गर्भपाताचे रॅकेट चालवण्याचा प्रकार गुरुवारी करवीर पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात शल्य चिकित्सक म्हणून काम केलेले डॉ. चंद्रकांत गायकवाड यांना या पथकाने पकडले आहे. त्यांच्याकडून २५० हून अधिक गर्भपात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या जिल्हातच एका निवृत्त शल्य चिकित्सकाकडून गर्भपाताचे इतके मोठे रॅकेट जात असल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेली माहिती अशी की,कोल्हापूर जवळील कळंबा येथील थ्री स्टार लॉज मध्ये बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करीत असल्या प्रकरणी अभिलेखावरील आरोपी स्वप्नील केरबा पाटील याला पकडण्यात आले होते. त्याच्यावर गर्भधारणा प्रसुतीपूर्व निदान तंत्र, महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम तसेच महाराष्ट्र शिष्यवृत्तीच्या ग्रह नोंदणी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान पोलीस कोठडीमध्ये संशयित आरोपी अश्विनी गजानन शिंदे हिने संशयित आरोपी बोगस डॉ. स्वप्नील पाटील यांच्याकडून तपासणी केलेल्या ज्या महिलांना मुलीचा गर्भ आहे अशा रुग्णांवर प्रतिमा रुग्णालय (भीम नगर हाऊसिंग सोसायटी, कदमवाडी ) येथे डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड हे गर्भपात करतात असे सांगितले होते.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रतिमा रुग्णालय येथे डमी रुग्ण पाठवून खात्री केली. डॉ. गायकवाड यांनी डमी रुग्णाला त्यांच्या दवाखान्यात केस पेपर न करता ऍडमिट करून घेतले. त्यांच्याकडील पोर्टेबल मशीनमध्ये गर्भपाताच्या गोळ्या देऊन बेकायदेशीररित्या गर्भपात करण्याची तयारी सुरू केली. याचवेळी पोलीस उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब पवार, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, वकरवीर पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मदने व करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हा अन्वेषण पथकाने कारवाई केली.
यावेळी पोलिसांनी बेकायदा गर्भपात करण्याचे पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र, गर्भपाताची औषधे, वैद्यकीय उपकरणे जप्त केली. पपोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशी वेळी संशयित आरोपी डॉ. चंद्रकांत गायकवाड यांनी २०० ते २५० गर्भपात केल्याचे मान्य केले. तसेच डॉक्टर गायकवाड यांनी गांधीनगर, सोलांकुर, हातकणंगले या कोल्हापूर जिल्ह्यातील गावांसह मुंबई, पोलादपूर, सिंधुदुर्ग,रायगड, रत्नागिरी, बीड येथे शल्य चिकित्सक तसेच सेंट जॉर्ज रुग्णालय येथे अतिरिक अधीक्षक, पुणे येथे सहाय्यक संचालक म्हणून काम केले आहे.
गायकवाड यांना अटक करत असताना प्रकृती बिघडल्याने ते अंतर रुग्ण म्हणून छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल झाले आहे.या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर,राहुल देसाई, विजय तळसकर, रणजीत पाटील, बजरंग लाड, अविनाश कांबळे, योगेश शिंदे, श्रीधर जाधव यांचा सहभाग होता. संशयित आरोपीस अटक करण्यात आले असून न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.
