कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण प्रकल्पासाठी घरांचे पुनर्वसन केल्यानंतर या परिसरातील पर्यावरणीय समतोल जपण्यासाठी जिल्हा प्रशासनाने डेरेदार वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. संबंधित विभागांच्या समन्वयातून अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने वृक्षांची मुळे सुरक्षित ठेवत त्यांचे काळजीपूर्वक स्थलांतर व पुनर्रोपण करण्यात आले आहे.
लक्ष्मीवाडी वसाहत, मुडशिंग या परिसरात वड-३, पिंपळ-१, कडुलिंब-७, चाफा-२, आंबा-५ आणि उंबर-४ अशी एकूण २२ झाडे होती. त्यापैकी चाफ्याची दोन झाडे यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात यशस्वीरीत्या पुनर्रोपित करण्यात आली आहेत. त्यानंतर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या वृक्षांचे शास्त्रोक्त पद्धतीने स्थलांतर व पुनर्रोपण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत यापूर्वी रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल परिसरात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते वडाच्या एका वृक्षाचे पुनर्रोपण करण्यात आले होते. त्यानंतर आता आणखी चार वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. यामध्ये वडाची तीन व पिंपळाचे एक अशा एकूण चार वृक्षांचा समावेश आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीरच्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील तसेच करवीरचे तहसीलदार स्वप्निल पवार उपस्थित होते.
विकास – पर्यावरण सांगड
विकासकामांसोबत पर्यावरण संवर्धनालाही समान प्राधान्य देण्याच्या शासनाच्या भूमिकेची ही कृतीशील अंमलबजावणी असून मोठ्या वृक्षांचे पुनर्रोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचा हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात असल्याचे उपजिल्हाधिकारी गुरव यांनी सांगितले.
नियमित देखभाल
पुनर्रोपित वृक्षांची नियमित देखभाल, पाणीपुरवठा आणि आवश्यक निगा राखण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित वृक्षांचेही योग्य ठिकाणी टप्प्याटप्प्याने पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासोबतच मोठ्या वृक्षांच्या फांद्याही नवीन ठिकाणी रोपण करण्यात आल्या आहेत, असे उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी सांगितले.
चांगला पायंडा
कोल्हापूरमध्ये वृक्ष पुनर्रोपण मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. रस्ते रुंदीकरण, विमानतळ विस्तार आणि बांधकामामुळे बाधित होणारी जुनी झाडे तोडण्याऐवजी, आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने सुरक्षितपणे स्थलांतरित केली जात आहेत.जोतिबा डोंगराच्या नैसर्गिक वैभवासाठी महामार्गाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या सुमारे २,००० जुन्या वृक्षांचे पुनर्रोपण करून नवजीवन देण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी’ आणि ‘वन विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ४० ते ७६ वर्षे जुनी झाडे (उदा. बेल, औदुंबर) सुरक्षितपणे अन्यत्र हलवून जगवण्यात यश आले आहे.निसर्ग मित्र परिवार’ सारख्या संस्था महिलांच्या मदतीने वड आणि इतर वृक्षांचे संवर्धन करून, ३ वर्षांनंतर ७ फूट उंच झालेली झाडे पुन्हा शहरात लावतात.
..
